शिर्डी : पेढे निकृष्ट व बुरशीयुक्त असल्याच्या प्रकरणाने काही काळापूर्वी शिर्डीत मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता शिर्डीतील डीमार्टमधून खरेदी करण्यात आलेले धारवाड पेढे बुरशीयुक्त असल्याचा गंभीर दावा समोर आला आहे. या प्रकारामुळे पॅकिंगमधून खरेदी करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिर्डीतील वसीम शब्बीर तांबोळी यांनी मुलगा झाल्याच्या आनंदात मित्रपरिवार आणि परिचितांना पेढे वाटण्यासाठी धारवाड पेढे खरेदी केल्याचे सांगितले. हे पेढे त्यांनी डीमार्टमधून सुमारे ५०० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केल्याचा त्यांचा दावा आहे.
तांबोळी यांनी सांगितले की, मुलगा झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि मित्र-परिवाराला पेढे वाटण्यासाठी त्यांनी पेढ्यांची खरेदी केली होती. मात्र, पेढ्यांचे पॅकिंग उघडल्यानंतर काही पेढे खराब आणि बुरशीयुक्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला.
“मुलगा झाल्याच्या आनंदात मित्रपरिवाराला पेढे वाटण्यासाठी पेढे आणले होते. दुकानदारांच्या सल्ल्याने डीमार्टमधून पेढे खरेदी केले. मात्र, पॅकिंग उघडल्यानंतर पेढे खराब असल्याचे दिसून आले. हे पेढे एखाद्या व्यक्तीने खाल्ले असते आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला असता तर त्याला जबाबदार कोण?” असा सवाल तांबोळी यांनी उपस्थित केला.
या पेढ्यांचे वाटप करण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने संभाव्य धोका टळल्याचे तांबोळी यांनी सांगितले. मात्र, असेच खराब खाद्यपदार्थ इतर ग्राहकांपर्यंत पोहोचल्यास नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
“आम्ही या प्रकरणाची संबंधित अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून, अशा खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी,” अशी मागणीही तांबोळी यांनी केली आहे.
दरम्यान, पॅकिंगमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर ग्राहकांचा विश्वास असतो. मात्र, विक्रीपूर्वी अशा उत्पादनांची गुणवत्ता, उत्पादन तारीख, कालबाह्यता तारीख आणि साठवणुकीची योग्य व्यवस्था याची काटेकोर तपासणी केली जाते का, असा सवाल या घटनेनिमित्ताने उपस्थित झाला आहे.
या प्रकरणाबाबत संबंधित कंपनी तसेच डीमार्ट प्रशासनाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसून, ग्राहकाच्या तक्रारीनंतर संबंधित यंत्रणा काय कारवाई करते, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.