शिर्डी : शिर्डी–अहिल्यानगर महामार्गावरील निकृष्ट डांबरीकरण, जागोजागी पडलेले प्रचंड खड्डे, तुटलेल्या गटारी आणि खराब झालेल्या डिव्हायडरमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटना सातत्याने आवाज उठवत असताना, दुसरीकडे शिर्डीत एका मंत्र्याचा मुलगा उघडपणे ठेकेदाराची बाजू घेत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे.
या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना राजेंद्र पिपाडा यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत म्हटले की, “लोक मला येऊन सांगतात, ‘पिपाडा जी, दाल में कुछ तो काला है.’ पण मी त्यांना म्हटलं, ‘यहाँ दाल में कुछ काला नहीं है, यहाँ तो पूरी दाल ही काली है!’”
शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, रस्त्याच्या कामातील निकृष्ट दर्जा आणि संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी तक्रारी केल्यास त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य आहे का, असा संतप्त सवालही पिपाडा यांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी शिर्डीत एका मंत्र्याच्या मुलाने राहाता परिसरातील लोक रस्त्याबाबत चार-चार, पाच-पाच पानांच्या तक्रारी करत असल्याचा उल्लेख केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राजेंद्र पिपाडा म्हणाले, “अरे, आम्ही रस्त्याच्या प्रश्नासाठी तक्रारी करायच्या नाहीत तर कोण करायच्या? लोकांच्या जीवाशी संबंधित प्रश्न असेल, रस्त्यावर रोज अपघात होत असतील, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असतील, तर जनतेने आवाज उठवायचा नाही का?”
या रस्त्यासाठी संघर्ष करणारे लोक मोजके नाहीत, तर विविध क्षेत्रातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने लढा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, खासदार नीलेश लंके, किरण राऊत, सचिन चौगुले, प्रमोद मोळ यांच्यासह ‘अहिल्यानगर ग्रुप’मधील अनेक सदस्य, विविध वकील आणि असंख्य नागरिकांनी या रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन आणि संघर्ष केला आहे, असेही पिपाडा यांनी सांगितले.
“मी एकटाच नाही. असंख्य लोक या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, जनतेचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि वारंवार होणारे अपघात थांबावेत यासाठी संघर्ष करत आहेत. मग तक्रारी करणाऱ्या जनतेलाच दोष देण्याऐवजी रस्त्याच्या निकृष्ट कामाची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याचा प्रश्न आता केवळ रस्त्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे. एकीकडे जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे ठेकेदाराची बाजू घेणारी वक्तव्ये होत असल्याने नागरिकांमध्ये आणखी संताप निर्माण झाला आहे.
“जनतेने तक्रार केली म्हणून जनता चुकीची ठरत नाही. उलट तक्रारी कराव्या लागतात, याचाच अर्थ प्रशासन आणि संबंधित यंत्रणा आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत,” अशी चर्चा आता परिसरात जोर धरत आहे.
शिर्डी–अहिल्यानगर रस्त्यावरील खड्डे, निकृष्ट डांबरीकरण, तुटलेल्या गटारी आणि धोकादायक डिव्हायडरची तातडीने दुरुस्ती करून दोषी ठेकेदार आणि संबंधितांवर कारवाई करण्यात येणार का, की जनतेच्या तक्रारींनाच ‘जास्त’ म्हणत हा गंभीर प्रश्न पुन्हा दुर्लक्षित केला जाणार, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
— असे भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा यांनी म्हटले आहे.