राहाता (तालुका प्रतिनिधी) : पक्षकारांमधील वाद संवादातून, परस्परांचा सन्मान राखून आणि सर्वमान्य तोडगा शोधून कायमस्वरूपी मिटविण्याची मध्यस्थी ही अत्यंत प्रभावी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिवाजी कचरे यांनी केले.
मुख्य मध्यस्थी केंद्र, मा. उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील विधीज्ञांसाठी शिर्डी येथे आयोजित ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिवाजी कचरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. आर. डी. पाटील उपस्थित होते.

जुन्या परंपरेला आधुनिक मध्यस्थीची शास्त्रीय जोड
न्या. कचरे म्हणाले, पूर्वी आपल्या समाजात ‘मध्यस्थी’ या प्रक्रियेला स्वतंत्र नाव नसले, तरी वाद सोडविण्याची ही पद्धत सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग होती. गावातील पंच, प्रतिष्ठित व्यक्ती अथवा दोन्ही पक्षांना मान्य असलेल्या व्यक्तीसमोर वाद ठेवला जात असे. दोन्ही बाजू शांतपणे ऐकून घेतल्यानंतर नाती आणि सामाजिक सलोखा टिकेल, असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असे.
आजची मध्यस्थी ही त्याच विचाराची अधिक शास्त्रशुद्ध, प्रशिक्षित, निष्पक्ष आणि गोपनीय स्वरूपातील प्रक्रिया आहे. मात्र आधुनिक मध्यस्थीमध्ये मध्यस्थ स्वतःचा निर्णय पक्षकारांवर लादत नाही. उलट, दोन्ही पक्षांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन स्वतःहून परस्परांना मान्य होईल असा तोडगा शोधण्यासाठी मदत करतो.
पक्षकारांनी मध्यस्थी प्रक्रियेवर विश्वास ठेवून एकमेकांचे म्हणणे संयमाने ऐकले, तर कितीही गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या वादातूनही समाधानाचा मार्ग निघू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘जिंकणे-हरणे’ नव्हे, तर दोन्ही बाजूंचे समाधान!
मध्यस्थीचा उद्देश स्पष्ट करताना न्या. कचरे म्हणाले, “द्वेष आणि संघर्षाचा अंधार दूर करून संवाद, समाधान आणि सौहार्दाचा मार्ग निर्माण करणे, हाच मध्यस्थीचा खरा उद्देश आहे.”
न्यायालयीन निर्णयामध्ये अनेकदा एका पक्षाचा विजय तर दुसऱ्या पक्षाचा पराभव होतो. मात्र मध्यस्थीमध्ये वादाचा शेवट करण्याबरोबरच तुटलेली नाती पुन्हा जोडण्याची संधी निर्माण होते. त्यामुळे मध्यस्थी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून सामाजिक सलोखा निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे.
मध्यस्थाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्याने निष्पक्ष राहून पक्षकारांमध्ये विश्वास निर्माण करणे, त्यांच्या भूमिकेमागील वास्तविक गरजा समजून घेणे आणि त्यांना स्वतःहून न्याय्य तोडगा शोधण्यासाठी सहाय्य करणे आवश्यक आहे. यासाठी संयम, संवेदनशीलता, प्रभावी संवादकौशल्य आणि गोपनीयतेचे काटेकोर पालन ही मध्यस्थाची प्रमुख कौशल्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ‘मध्यस्थी संस्कृती’ अधिक दृढ होणार
या प्रशिक्षणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यस्थीची संस्कृती अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास न्या. शिवाजी कचरे यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगरचे सचिव श्री. योगेश पैठणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास कोपरगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. डी. डी. अलमले, श्रीरामपूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. साळवे, राहाता वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पी. डी. बेंद्रे, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. सी. लासुरे, श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. के. चोरमल यांच्यासह ज्येष्ठ विधीज्ञ उपस्थित होते.
मा. उच्च न्यायालय, मुंबईच्या मुख्य मध्यस्थी केंद्रामार्फत या प्रशिक्षणासाठी २रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, बारामती, मा. न्यायाधीश श्री. एस. आर. मोकाशी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव श्री. ए. ए. देशपांडे यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४९ विधीज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग
शिर्डी येथे आयोजित या ४० तासांच्या प्रशिक्षणाचा लाभ राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर येथील तब्बल ४९ विधीज्ञांनी घेतला. तालुकास्तरावर अशा स्वरूपाचे मध्यस्थी प्रशिक्षण प्रथमच आयोजित करण्यात आल्याने वकील संघाच्या सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, भविष्यात न्यायालयीन वाद सामंजस्याने सोडविण्याच्या प्रक्रियेला यामुळे निश्चितच चालना मिळणार आहे.