शिर्डी : नगरपालिकेकडे ड्रेनेज लाईन फुटल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून दोन जणांनी थेट महिलेच्या घरासमोर धिंगाणा घालत तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना शिर्डीत घडली. एवढ्यावरच न थांबता दगडाने महिलेच्या डोक्यावर प्रहार करून तिला रक्तबंबाळ करण्यात आले. महिलेच्या मुलीलाही दगड लागून दुखापत झाली.
दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता ही घटना घडली. फिर्यादी महिलेने यापूर्वी नगरपालिकेत ड्रेनेज लाईन फुटल्याबाबत तक्रार केली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून सचिन लक्ष्मण गव्हाणे व राजू लक्ष्मण गव्हाणे हे तिच्या घरासमोर आले.
‘तू नगरपालिकेत तक्रार का केलीस?’ असा जाब विचारत आरोपींनी महिलेला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जमिनीवर पडलेल्या दगडाने तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूस मारल्याने डोक्यातून रक्तस्राव झाला. महिलेची मुलगी दिव्या हिलाही दगड लागल्याने पाठीला मुका मार लागला.
दरम्यान, आरोपींनी महिलेला आणि तिच्या तीन मुलींना तसेच पतीला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमी महिलेने उपचारासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी दोघांविरुद्ध BNS कलम 118(1), 351(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
महिलेवर हात उचलण्यापर्यंत मजल गेल्याने या प्रकरणाकडे आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.