
शिर्डी | प्रतिनिधी
देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर निवडणूक व्यवस्था, राजकीय पक्ष, मतदार आणि प्रशासन यांच्याबाबत अत्यंत स्पष्ट व परखड भूमिका मांडली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी उमेदवारी देणे हा लोकशाहीवरील मोठा अन्याय असून, अशा उमेदवारांना तिकीट देणारे पक्षही तितकेच दोषी आहेत, असा थेट इशारा त्यांनी दिला.
किरण बेदी आपल्या परिवारासह शिर्डीत आल्या होत्या. श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी साईबाबांची मूर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक व्यवस्थेतील वाढता पैशाचा प्रभाव, गुन्हेगारीचे राजकारण आणि प्रशासनातील प्रामाणिकपणा या विषयांवर सडेतोड मते व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, एखाद्या उमेदवाराविरोधात न्यायालयाने गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोप निश्चित केले असतील तर त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देऊ नये. न्यायालयाने आरोप निश्चित करणे म्हणजे त्या प्रकरणात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे मान्य केलेले असते. त्यामुळे कोणताही पक्ष असो, अशा व्यक्तींना तिकीट देणे ही अत्यंत चुकीची भूमिका आहे. उमेदवार निवडताना पक्षांनी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींनाच संधी दिली पाहिजे.
मतदारांनाही त्यांनी तितक्याच कठोर शब्दांत फटकारले. “मी अनेक ठिकाणी पाहिले आहे की मतदार स्वतः उमेदवारांकडे पैशांची मागणी करतात. अनेक जण सर्वच पक्षांकडून पैसे घेतात आणि नंतर आपल्या मनाप्रमाणे मतदान करतात. ही प्रवृत्ती थांबली नाही तर निवडणूक व्यवस्था कधीच स्वच्छ होणार नाही. लोकशाही मजबूत करायची असेल तर बदलाची सुरुवात मतदारांनी स्वतःपासून केली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
निवडणुकीपूर्वी दिल्या जाणाऱ्या मोफत योजनांच्या आणि घोषणांच्या राजकारणावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “राजकारण आज देण्या-घेण्याचा व्यवहार बनत चालले आहे. निवडणुकीपूर्वी मतदारांना विविध आमिषे दाखवून मते मिळवण्याची स्पर्धा लोकशाहीला घातक आहे. यावर सर्व पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा किंवा न्यायालयाने कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत,” असे त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आजही त्यांच्याशी नियमित संपर्क आहे. “अण्णा हजारे हे मोजकेच बोलतात; पण जेव्हा बोलतात तेव्हा अत्यंत विचारपूर्वक आणि समाजहिताचा विचार करूनच बोलतात. त्यांनी देशाला दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना,” असे त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधी यांच्या वाहनावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केल्याच्या प्रसंगाची आठवण करून देत आजही तशी हिंमत अधिकाऱ्यांमध्ये आहे का, असा प्रश्न विचारला असता किरण बेदी म्हणाल्या, “आजही ते शक्य आहे. मात्र त्यासाठी बदलीची भीती मनातून काढून टाकावी लागेल. जो अधिकारी बदलीसाठी मानसिकदृष्ट्या तयार असतो, त्याला कोणाच्याही दबावाची भीती वाटत नाही. प्रामाणिकपणे काम करा, बदली झाली तरी नवीन ठिकाणीही त्याच निष्ठेने सेवा द्या.”
आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वाचा संदेश देताना सांगितले की, “कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कोणत्याही राजकीय दबावाला घाबरू नका. बदली ही शिक्षाच नाही; ती नवी संधी आहे. जो अधिकारी सचोटीने काम करतो, त्याची खरी ताकद त्याच्या प्रामाणिकपणात असते.”
संसदेतील खासदारांची संख्या वाढवण्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी लोकसंख्या वाढीमुळे मतदारसंघही मोठे झाले असल्याचे सांगितले. त्यामुळे भविष्यात खासदारांची संख्या वाढवणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र संख्या वाढवण्यापेक्षा निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेचा विश्वास जपणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींवर जनता मोठा विश्वास ठेवते. त्यामुळे संसदेत पोहोचणाऱ्या प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करून समाज आणि देशाची सेवा केली पाहिजे. जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे हीच खरी लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचेही किरण बेदी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
: किरण बेदींचे ठळक संदेश
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना पक्षांनी तिकीट देऊ नये.
मतदारांनी पैशांच्या आमिषाला बळी पडणे थांबवावे.
निवडणूकपूर्व मोफत घोषणांवर नियंत्रण आवश्यक.
अधिकारी बदलीची भीती न बाळगता प्रामाणिकपणे काम करावेत.
लोकप्रतिनिधींनी जनतेचा विश्वास जपत देशसेवा करावी.
