शिर्डी | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखूच्या धंद्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम सुरू केली आहे. पाथर्डी, कोपरगाव आणि लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत सात आरोपींविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल ३४ हजार ९७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईतील कोपरगाव गुन्ह्यातील निमगाव येथील जावेद शेख हा फरार असल्याचे पोलिसांनी अधिकृत प्रेसनोटमध्ये नमूद केले आहे.
कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१६/२०२६ अन्वये बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चांदे-कसारे येथील विनायक वामनराव होन याच्यासह निमगाव, ता. राहाता येथील जावेद शेख याचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार जावेद शेख फरार आहे.

या कारवाईत कोपरगाव प्रकरणातून १२ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे निमगाव परिसरात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखूच्या व्यवसायाचे जाळे किती खोलवर आहे, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
फरार आरोपींचा शोध कधी?
पाथर्डी, कोपरगाव आणि लोणी येथील कारवाईत एकूण सात आरोपींची नावे समोर आली असून त्यापैकी काही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केवळ मुद्देमाल जप्त करून कारवाई थांबणार की फरार आरोपींच्या मुसक्या आवळून या अवैध धंद्याच्या मुळापर्यंत पोहोचणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, निमगाव येथील जावेद शेख याचे नाव अधिकृत पोलिस प्रेसनोटमध्ये फरार आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जावेद शेख नेमका कुठे आहे? त्याचा या अवैध व्यवसायातील सहभाग किती? त्याच्यामागे आणखी कोणाचे हात आहेत का? याचा तपास पोलिसांनी गांभीर्याने करण्याची गरज आहे.
मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली LCBची धडक
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्यासह पोलीस अंमलदारांच्या पथकाने जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची माहिती संकलित करून ही कारवाई केली.
‘साईदर्शन’चा सवाल :
गुटख्याचा साठा पकडला, आरोपींची नावे समोर आली; पण फरार जावेद शेखपर्यंत पोलीस कधी पोहोचणार? निमगाव परिसरातील अवैध गुटखा व्यवसायाच्या मुळाशी जाणार का?