शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व तथा समाजप्रबोधनकार ज्ञानदेव (आबा) निवृत्ती पा. गोंदकर यांचे वयाच्या ९२व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिर्डी परिसरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गोंदकर परिवाराच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
ज्ञानदेव आबा यांची शिर्डी परिसरात प्रगतिशील शेतकरी, अभ्यासू ज्येष्ठ नागरिक आणि समाजप्रबोधनकार म्हणून विशेष ओळख होती. आयुष्यभर निर्व्यसनी जीवन जगताना त्यांनी आपल्या आचरणातून अनेकांना प्रेरणा दिली. समाजातील विविध विषयांचा सखोल अभ्यास करून त्यावर सातत्याने प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी केले.

शिर्डी गावाच्या वाटचालीचा प्रदीर्घ इतिहास त्यांनी जवळून अनुभवला होता. ग्रामपंचायतीच्या काळापासून ते श्री साईबाबा संस्थानच्या स्थापनेपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचे ते साक्षीदार होते. शिर्डीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रवासातील अनेक आठवणींचा ठेवा त्यांच्या स्मरणात होता. हा अनुभव आणि ज्ञान ते नेहमीच तरुण पिढीसोबत मनमोकळेपणाने शेअर करीत असत.
ज्येष्ठांच्या फळीतील अभ्यासू, अनुभवी आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व म्हणून आबा गोंदकर यांचा शिर्डीत लौकिक होता. साधेपणा, निर्व्यसन, सामाजिक भान आणि आपल्या अनुभवातून समाजाला योग्य दिशा देण्याची त्यांची भूमिका ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.
. त्यामुळे त्यांच्या निधनाने गोंदकर परिवारासह विखे परिवाराशी संबंधित आप्तेष्ट व स्नेही परिवारावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिर्डीने एक अनुभवाचा ठेवा गमावला
ज्ञानदेव आबा गोंदकर यांच्या निधनाने शिर्डीने केवळ एक ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी गमावलेला नाही, तर गावच्या इतिहासाचा साक्षीदार, तरुणांना मार्गदर्शन करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि समाजप्रबोधनाची ज्योत तेवत ठेवणारा एक अनुभवी ज्येष्ठ हरपला आहे. त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेले विचार पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरतील.
दैनिक साईदर्शन शिर्डी साईबाबांच्या परिवाराच्या वतीने कै. ज्ञानदेव (आबा) निवृत्ती पा. गोंदकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ साई राम! 🙏🌹
त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि गोंदकर परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती श्री साईबाबा प्रदान करो, हीच साईचरणी प्रार्थना.