कोपरगाव | प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर वाहनांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी डाव उधळून लावला. कोकमठाण हद्दीत पुलाखाली संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या पिकअप वाहनाची झडती घेतली असता तलवार, कत्ती, वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी खिळे ठोकलेल्या लाकडी फळ्या तसेच बनावट नोटांची बंडले आढळून आली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांचे पथक समृद्धी महामार्ग परिसरात गस्त घालत होते. यावेळी पुलाखाली पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (एमएच ०५ एफजे १७९८) संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन चौकशी केली असता त्यातील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.
महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांतील व्यक्तींना धमकावून लुटण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पथकाने तत्काळ कारवाई केली.
या कारवाईत विवेक भरत शेलार (२३), ओमकार मारुती जगताप (१९), रोहित सुरेश परब (३१) आणि बाळकृष्ण राहुल सपकाळे (१९) यांना ताब्यात घेण्यात आले. तर अंधाराचा फायदा घेत आणखी एक संशयित पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी पिकअप वाहनासह सुमारे ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या टोळीचा यापूर्वीच्या महामार्गावरील लूटमार किंवा चोरीच्या घटनांशी संबंध आहे का? पसार झालेला ‘बबलू’ नेमका कोण? टोळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? महामार्गावरील कोणत्या वाहनांना लक्ष्य करण्यात येणार होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहेत.
शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे पुढील तपास करीत आहेत.