
कॉकरोच जनता पार्टी”च्या माध्यमातून बेरोजगारांचा संताप उफाळला; साई संस्थानवरही गंभीर आरोपांचा भडिमार ! 🚨
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या कथित “झुरळ” आणि “पेस्टिसाइड” संदर्भातील टिप्पणीवरून देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता या विरोधाला संघटित स्वरूप मिळताना दिसत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा आवाज बनत अभिजित दिपके या तरुणाने सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी”ची स्थापना करत थेट व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. अवघ्या एका दिवसात या पेजला तब्बल ८ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाल्याने देशातील तरुणांच्या मनातील असंतोष किती खोलवर आहे, हे स्पष्ट झाले आहे.
बोस्टन विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या आणि आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये तीन वर्षे काम केलेल्या अभिजित दिपके यांनी बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि नोकरीच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याऐवजी बेरोजगारांची खिल्ली उडवल्याचा आरोप करत संतप्त भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर हजारो तरुण या “कॉकरोच जनता पार्टी”च्या माध्यमातून आपले प्रश्न मांडताना दिसत आहेत.
या आंदोलनाची झळ आता शिर्डीपर्यंत पोहोचली असून साईबाबा संस्थानविरोधातही “कॉकरोच जनता पार्टी”च्या मागण्यांचे फलक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर अँड. गोकुळ व्ही. ठुबे यांनी साईबाबा संस्थानातील कथित भ्रष्टाचार, बोगस शैक्षणिक कागदपत्रे, प्रभारी अधिकाऱ्यांचा कारभार आणि कर्मचारी भरतीतील अनियमितता यावर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला आहे.
अँड. ठुबे यांच्या म्हणण्यानुसार, संस्थानातील अनेक कर्मचारी व पदाधिकाऱ्यांकडे बोगस डिग्री असून याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, तदर्थ समिती अध्यक्ष तसेच विधी व न्याय विभागाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असून संस्थान प्रशासन माननीय अध्यक्षांचे आदेशही पाळत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.ज्यांचे जवळ खरी शैक्षणिक पात्रता आहे ती लोक साईबाबा संस्थानच्या बाहेर व त्यांचे जवळ शासकीय विद्यापीठाची कागदपत्रे नाहीत ती लोक मात्र पदावर बसलेली आहेत हा देखील सामान्य तरुणांवर अन्याय आहे
याशिवाय सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असतानाही अनेक पदांवर प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नियमबाह्य कारभार सुरू असल्याचे अँड ठुबे यांनी म्हटले आहे. “त्या सर्व पदांसाठी नव्याने जाहिराती काढून पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी, बोगस कागदपत्रधारक कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि वशिल्याने बसवलेले कर्मचारी मूळ पदावर पाठवावेत,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाने ५९८ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश दिले असतानाही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत, आश्वासित सेवा लाभांमध्ये शैक्षणिक अटी लावून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“साईबाबा संस्थान प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास कर्मचारी संघटनांना सोबत घेऊन मोठे आंदोलन छेडले जाईल आणि उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढली जाईल,” असा इशाराही अँड. गोकुळ ठुबे यांनी माहितीपत्रकाद्वारे दिला आहे.
🔥 “बेरोजगारांना झुरळ समजणाऱ्यांना आता तरुणच उत्तर देणार?” — कॉकरोच जनता पार्टीची देशभरात चर्चा ! 🔥
खरी पात्रता असलेले तरुण बाहेर… आणि संशयित कागदपत्रधारक पदांवर?” ⚠️
╠════════════════════════════════════╣
साईबाबा संस्थानमध्ये ज्या तरुणांकडे खऱ्या अर्थाने शासकीय विद्यापीठाच्या वैध पदव्या, पात्रता आणि गुणवत्ता आहे, ते आजही नोकरीच्या प्रतीक्षेत संस्थानच्या बाहेर उभे आहेत. दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्यांकडे शैक्षणिक कागदपत्रांबाबत संशय व्यक्त केला जात आहे किंवा ज्यांची कागदपत्रे तपासणीअभावी वादग्रस्त ठरत आहेत, अशीच मंडळी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याचा आरोप होत आहे.
ही परिस्थिती म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर सरळ अन्याय असल्याची भावना आता तीव्र होत आहे. “मेहनत करून शिक्षण घेणाऱ्यांना संधी नाही आणि वशिला व संशयित कागदपत्रांच्या जोरावर पदे मिळतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटू लागली आहे.
अनेक तरुणांनी संस्थान प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच रिक्त पदांसाठी पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे.

