
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील गाजत असलेल्या कथित लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासात आता एस.एस. हॉटेलच्या नोंदी तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी एस.एस. हॉटेलचे मालक प्रकाश सोपान जगताप, राजेंद्र सोपान जगताप, विजय सोपान जगताप, योगेश दत्तात्रय जगताप आणि गणेश दत्तात्रय जगताप यांना बी.एन.एस.एस. कलम 179 अन्वये नोटीस बजावत 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने हॉटेल मालक जगताप हे पोलीस ठाण्यात जाऊन आपले म्हणणे सादर केले
पोलीस नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, गुन्हा क्र. 590/2026 मधील फिर्यादी महिलेने जून 2021 ते जून 2026 या कालावधीत आरोपी दादाराव रामोजी भांगे याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार, या घटना एस.एस. हॉटेलमधील रूम क्रमांक 103 मध्ये घडल्याचा दावा करण्यात आला असून, 13 जून 2026 रोजी याच ठिकाणी वाद झाल्याचाही उल्लेख आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हॉटेल चालविण्याचा करार, जून 2021 ते जून 2026 या पाच वर्षांतील रूम बुकिंग रजिस्टर, ऑनलाइन बुकिंगची माहिती, आरोपी आणि फिर्यादीने सादर केलेल्या ओळखपत्रांच्या प्रती तसेच उपलब्ध सर्व सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिलेहोते. तपासासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मागविलेली माहिती वेळेत सादर न केल्यास संबंधितांना काही म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या प्रकरणात हॉटेलमधील नोंदी, ओळखपत्रे आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज हे तपासातील महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. त्यामुळे आता तपासाची दिशा या कागदपत्रांवर आणि तांत्रिक पुराव्यांवर अवलंबून राहणार असून, आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.
दबंग अधिकारी सागर काळे यांच्या हाती तपास
शिर्डी पोलीस ठाण्यातील गाजत असलेल्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्याकडे असून, त्यांनी तपासाला वेग दिला आहे. तपासाच्या अनुषंगाने एस.एस. हॉटेलच्या पाच मालकांना बी.एन.एस.एस. कलम 179 अन्वये नोटीस बजावत पाच वर्षांतील रूम बुकिंग रजिस्टर, ऑनलाइन बुकिंगची माहिती, ओळखपत्रांच्या प्रती, करारनामा तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील प्रत्येक पुराव्याची बारकाईने पडताळणी करून तपास पुढे नेला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

