Letest News
मायेची सावली हरपली! आदर्श माता वत्सलाबाई गडकरी काळाच्या पडद्याआड साईभक्तीचा अनोखा सेवाभाव! पुण्यातील चौगुले कुटुंबीयांकडून साईसंस्थानला १२ लाख ८४ हजारांची भरघोस देणग... मंदिर व्यवस्थापन आता केवळ परंपरेपुरते नाही-आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचीही गरज – गोरक्ष गाडीलकर मुख्यमंत्र्यांचा जीआर निघाला-मग शिर्डी मतदारसंघातील गोरगरीबांना सातबारा कधी मिळणार? डॉ. राजेंद्र पिप... शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देणाऱ्या सुजय विखेंनी जनतेच्या प्रश्नांच्या कुंपणात अडकू नये टीकेला उत्त... १५ वर्षांच्या शोषणाचा गंभीर आरोप-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावर बलात्काराचा गुन्... शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती जिल्हा प्रमुख कमलाकर कोते मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!” श्री द्वारकामाईत तुळशी-विष्णू विवाहाचा मंगल सोहळा भक्तिभावात संपन्न! रोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय?
राजकीयशिर्डी

मायेची सावली हरपली! आदर्श माता वत्सलाबाई गडकरी काळाच्या पडद्याआड

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

आई हा शब्द उच्चारताच मनात प्रेम, माया, त्याग, वात्सल्य आणि आपुलकीच्या असंख्य भावना दाटून येतात. आई म्हणजे केवळ एका कुटुंबाचा आधार नसतो, तर ती संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी प्रेमाची वीण असते. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर झटणारी, संकटाच्या काळात धीर देणारी, चुकांवर प्रेमाने समजावून सांगणारी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी धडपडणारी आई म्हणजे ईश्वराने माणसाला दिलेली सर्वांत अनमोल देणगी!

अशाच धार्मिक, सुस्वभावी, प्रेमळ आणि मायाळू व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील कै. ग.भा. वत्सलाबाई विठ्ठल गडकरी यांचे मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गडकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील एक आदर्श आणि प्रेमळ मातृव्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्या दैनिक साईदर्शनचे उपसंपादक तथा पत्रकार राजकुमार गडकरी यांच्या मातोश्री होत.

DN SPORTS

kamlakar

सुख-दुःखात धावून येणाऱ्या सहकाऱ्याच्या दुःखात साईदर्शन परिवारही सहभागी!

दैनिक साईदर्शनच्या वाटचालीत उपसंपादक राजकुमार गडकरी यांचे योगदान आणि त्यांचे सहकार्य नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहे. सुख असो अथवा दुःख, अडचण असो अथवा संकट, कोणत्याही प्रसंगी निस्वार्थ भावनेने धावून येणारे, सहकाऱ्यांच्या अडचणींना स्वतःच्या अडचणी समजून मदतीचा हात देणारे आणि कोणताही स्वार्थ न ठेवता आपुलकीने माणसे जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

अशा या आपल्या सहकाऱ्याच्या डोक्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपणे ही दैनिक साईदर्शन परिवारासाठीदेखील मनाला चटका लावणारी घटना आहे. राजकुमार गडकरी यांच्या आयुष्यातील आईचे स्थान किती मोठे होते, हे त्यांच्या कुटुंबाविषयीच्या जिव्हाळ्यातून आणि मातोश्रींनी दिलेल्या संस्कारांतून सहज जाणवते. आज त्यांच्या घरातील मायेचा आधार हरपला असला, तरी मातोश्रींनी दिलेले संस्कार आणि आशीर्वाद त्यांच्या आयुष्याला सदैव दिशा देत राहतील.

संगमनेरच्या गंगामाई घाटावरून सुरू झाला अध्यात्माचा प्रवास!

कै. वत्सलाबाई विठ्ठल गडकरी या अगदी लहानपणापासून संगमनेर येथील श्री गंगामाई मंदिराच्या घाटावरील महान तपस्वी सद्गुरू सिताराम महाराज यांच्या अनुयायी आणि निष्ठावान शिष्या होत्या. त्यांचे पती कै. विठ्ठल मनाजी गडकरी यांच्यासह त्यांनी प्रवरा नदीच्या काठावरील निसर्गरम्य गंगामाई घाटावरील मठात सद्गुरू सिताराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनातील अनेक वर्षे आध्यात्मिक वातावरणात व्यतीत केली.

सद्गुरूंच्या शिकवणीचा आणि धार्मिक संस्कारांचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला होता. पुढे सावळी विहीर बुद्रुक येथे स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपल्या घरातील आध्यात्मिक वातावरण कायम जपले. श्री सद्गुरू सिताराम महाराज आणि श्री साईबाबांवर त्यांची अपार श्रद्धा होती. नामस्मरण, भजन, भक्ती आणि धार्मिक आचरण हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.

कुटुंबासाठी आयुष्यभर झटणारी, प्रत्येकाची काळजी घेणारी माऊली!

वत्सलाबाई म्हणजे नावाप्रमाणेच वात्सल्याचा अथांग सागर होत्या. घरातील प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडी, आरोग्य, सुख-दुःख यांची त्या अगदी मनापासून काळजी घेत असत. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदी कशी राहील, यासाठी त्यांची नेहमी धडपड असे.

वयाची मर्यादा आणि शारीरिक अडचणी असतानाही जोपर्यंत त्यांना शक्य होते, तोपर्यंत त्या पहाटे लवकर उठून घरातील कामे आनंदाने आणि उत्साहाने करत असत. पुढे वय झाल्यानंतर घरातील मुलांनी, सुना आणि नातवंडांनी केलेल्या कामातही त्या प्रेमाने मार्गदर्शन करत. घरी आलेल्या पाहुण्यांची, नातेवाइकांची आणि परिचितांची सर्वांत प्रथम विचारपूस करणे, त्यांचे आदरातिथ्य करणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता.

गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी मायेने बोलणे, प्रत्येकाला आपलेसे करणे आणि कोणाच्याही सुख-दुःखात आपुलकीने सहभागी होणे, यामुळे त्या परिसरात लोकप्रिय होत्या. कोणाच्या त्या काकू होत्या, कोणाच्या मामी, कोणाच्या मावशी, तर कोणाच्या प्रेमळ माता होत्या. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नव्हते, तर अनेकांच्या मनात त्यांनी आपलेपणाचे स्थान निर्माण केले होते.

मृत्यूच्या संकटावरही मात; साईकृपेवरील श्रद्धा अखेरपर्यंत कायम!

वत्सलाबाई यांची आत्मशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती विलक्षण होती. संगमनेर येथे झालेल्या कार अपघातातून त्या सुखरूप बचावल्या होत्या. या अपघातानंतर त्यांना अनेक महिने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. मात्र जिद्द, कुटुंबीयांचे प्रेम आणि ईश्वरावरील श्रद्धेच्या बळावर त्यांनी पुन्हा प्रकृती सुधारली आणि पूर्ववत जीवन जगण्यास सुरुवात केली.

सुमारे चार वर्षांपूर्वी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्या संकटातूनही श्री साईबाबांच्या कृपेने त्या सुखरूप बचावल्या. अलीकडेच निमोनियाच्या आजारातूनही त्या उपचार घेऊन घरी परतल्या होत्या. मात्र वाढते वय आणि कमी होत चाललेली शारीरिक प्रतिकारशक्ती यामुळे शरीर हळूहळू साथ देत नव्हते.

दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज असे सण कुटुंबीयांसमवेत आनंदात पार पडल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनप्रवासाची अखेरची वाट धरली. विशेष म्हणजे मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी मंदिरातील कार्तिक महिन्यातील काकड आरतीचे भजन आणि आपल्या सद्गुरूंनी सांगितलेले ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ हे भजन ऐकत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भक्तिमय वातावरणात या माऊलीने इहलोकाचा निरोप घेतला.

पती-पत्नीच्या जीवनप्रवासाचा अनोखा आध्यात्मिक योगायोग!

या दुःखद घटनेतील आणखी एक भावनिक आणि विलक्षण योगायोग म्हणजे त्यांचे पती कै. विठ्ठल मनाजी गडकरी यांचेही तीन वर्षांपूर्वी याच कार्तिक महिन्यात, दि. १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास मंदिरातील काकड भजन सुरू असताना निधन झाले होते.

पती-पत्नी दोघांनीही आयुष्यभर अध्यात्माची वाट धरली. सद्गुरू सिताराम महाराजांच्या शिकवणीवर आणि श्री साईबाबांच्या चरणी त्यांची अढळ श्रद्धा होती. दोघांच्याही जीवनप्रवासाचा शेवट काकड भजनाच्या पवित्र वातावरणात झाला, हा त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा भावनिक योगायोग ठरला आहे.

आई गेली, पण तिचे संस्कार आणि मायेच्या आठवणी कायम राहतील!

आईचे जाणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचे निधन नसते, तर घरातील प्रेमाचा, आपुलकीचा आणि सुरक्षिततेचा एक मोठा आधार हरपणे असते. घरात आई असते, तोपर्यंत तिच्या अस्तित्वाची खरी किंमत अनेकदा जाणवत नाही. मात्र तिच्या जाण्यानंतर घरातील प्रत्येक कोपरा तिच्या आठवणी सांगू लागतो. तिची हाक, तिचे बोलणे, तिची विचारपूस, तिच्या हातचे जेवण आणि प्रत्येकाच्या काळजीने भरलेली तिची नजर या सर्व गोष्टी आठवणींच्या रूपाने मनात कायमच्या कोरल्या जातात.

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या उक्तीचा खरा अर्थ आईच्या जाण्यानंतरच प्रकर्षाने जाणवतो. आई ही मुलांची पहिली गुरू असते. तीच जीवनातील सत्य, प्रामाणिकपणा, माणुसकी, धार्मिकता आणि संस्कारांची शिकवण देते. तिच्या कष्टातून कुटुंब उभे राहते आणि तिच्या आशीर्वादातून पुढील पिढ्यांना जगण्याचे बळ मिळते.

कै. वत्सलाबाई यांनीही आपल्या संपूर्ण आयुष्यात कुटुंबाला प्रेम, धार्मिकता, माणुसकी आणि आपुलकीचा वारसा दिला. आज त्या देहाने आपल्यात नसल्या, तरी त्यांनी दिलेली शिकवण, संस्कार आणि आशीर्वाद त्यांच्या मुलांच्या, नातवंडांच्या आणि परिचितांच्या जीवनात सदैव जिवंत राहतील.

अशा या आदर्श माऊलीच्या निधनाने सावळी विहीर बुद्रुक परिसरातील एक प्रेमळ मातृव्यक्तिमत्त्व हरपले आहे. विशेषतः राजकुमार गडकरी यांच्या डोक्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपल्याने निर्माण झालेली पोकळी शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.

दशक्रिया विधी गुरुवारी; भावपूर्ण श्रद्धांजली!

कै. ग.भा. वत्सलाबाई विठ्ठल गडकरी यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सावळी विहीर बुद्रुक येथील श्रीदेवी भवानी माता मंदिराजवळील पाटावर होणार आहे.

या दुःखद प्रसंगी दैनिक साईदर्शन परिवाराच्या वतीने कै. वत्सलाबाई गडकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच उपसंपादक राजकुमार गडकरी आणि गडकरी कुटुंबीयांच्या दुःखात दैनिक साईदर्शन परिवार मनापासून सहभागी आहे.

हे परमेश्वरा, हे साईनाथा, हे सद्गुरुनाथा! या माऊलीच्या पवित्र आत्म्यास चिरशांती आणि सद्गती लाभो. गडकरी कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. त्यांनी दिलेले संस्कार, त्यांचे आशीर्वाद आणि मायेची शिकवण पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहो, हीच श्री साईचरणी विनम्र प्रार्थना!

भावपूर्ण श्रद्धांजली!

शब्दांकन : श्री. जितेश मनोहरलाल लोकचंदानी
संपादक : दैनिक साईदर्शन

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button