शिर्डी | प्रतिनिधी

श्री साईबाबांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या श्री द्वारकामाई मंदिरात भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक धार्मिक संस्कृतीचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक रुढी-परंपरेनुसार तुळशी विवाह सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात आणि साईभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपात हा धार्मिक सोहळा पार पडला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या शुभहस्ते तुळशी विवाहाचे विधिवत पूजन करण्यात आले.
सोहळ्याची सुरुवात श्रीगणेश पूजनाने झाली. त्यानंतर धार्मिक परंपरेनुसार तुळशी-विष्णू विवाहाचे विधी पार पडले. आरती, नैवेद्य अर्पण आणि विविध पूजाविधींनी या सोहळ्याची मंगलमयता अधिकच वाढवली. यावेळी द्वारकामाई मंदिरातील वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. उपस्थित भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा भक्तिभावाने लाभ घेतला.
या प्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारा हा तुळशी विवाह सोहळा श्री साईबाबांच्या पावन सान्निध्यात भक्तांसाठी एक अविस्मरणीय धार्मिक अनुभूती ठरला.