शिर्डी, प्रतिनिधी / शिवसेना उत्तर अहिल्यानगरच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडीसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना, शिवसेना महिला आघाडी व युवासेना या तिन्ही संघटनांमधील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा परिषद गटप्रमुख आणि पंचायत समिती गणप्रमुख या पदांसाठी या मुलाखती होणार आहेत. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा तालुक्यांसाठी दि. २३ व २४ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात या मुलाखती घेण्यात येणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मुलाखतींमध्ये प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली असून, इच्छुकांनी आपल्या तालुक्याच्या वेळेतच उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मुलाखती शिवसेनेचे संपर्कप्रमुख, शिर्डी लोकसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुकांची संघटनात्मक क्षमता, सामाजिक कार्य, राजकीय अनुभव आणि पक्षनिष्ठा या निकषांवर निवड केली जाणार आहे.मुलाखतींचे वेळापत्रक असे सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता संगमनेर तालुका, दुपारी १.०० वाजता नेवासा तालुका आणि दुपारी ३.०० वाजता अकोले तालुक्याच्या मुलाखती होणार आहेत. तर मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता राहाता तालुका, दुपारी १.०० वाजता कोपरगाव तालुका आणि दुपारी ३.०० वाजता श्रीरामपूर तालुक्याच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभाकर शिंदे, सागर भैय्या बेग, डॉ. जालिंदर भोर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे मुलाखतींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.इच्छुक शिवसैनिकांनी मुलाखतीस येताना आपल्या सामाजिक, राजकीय व संघटनात्मक कार्याचा सविस्तर कार्य अहवाल सोबत आणावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व शिवसेना उत्तर अहिल्यानगर जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले आहे. संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी प्राधान्य दिले जाणार आहे