दाढ बु. आरोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय?
रेबीज लस, सर्पदंशावरील इंजेक्शन आणि Anti-D चा साठा अवघ्या दोन नगांवर; ४५०० हून अधिक औषधांच्या मुदतबाह्य नोंदींचा गंभीर प्रश्न!
कागदी नोंदवहीत औषधांचा तपशील, सरकारी पोर्टलवर मात्र ‘No Data Found’; आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
राहाता | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना तातडीने आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, याच आरोग्य व्यवस्थेचा कारभार किती बेफिकीरपणे सुरू आहे, याचा धक्कादायक नमुना दाढ बु. प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती अधिकारातून समोर आला आहे. कुत्रा चावल्यानंतर जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणारी रेबीज प्रतिबंधक लस अवघ्या दोन नगांवर, सर्पदंशावरील Anti Snake Venom फक्त दोन नगांवर, तर गर्भवती महिलांसाठी आवश्यक असणारे Anti-D इंजेक्शनही केवळ दोन नगांवर असल्याची नोंद अधिकृत कागदपत्रांत आढळली आहे. दुसरीकडे हजारोंच्या संख्येने औषधे मुदतबाह्य होण्यासंदर्भातील नोंदी आणि शासनाच्या अधिकृत पोर्टलवरील ‘No Data Found’ हा विरोधाभास आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र सातपुते यांनी दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत या आरोग्य केंद्राच्या औषधसाठ्याची माहिती मागवली होती. त्यानंतर दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्यानिशी प्रमाणित (True Copy) कागदपत्रे देण्यात आली. या कागदपत्रांनी आरोग्य केंद्रातील औषध व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
१. जीव वाचवणाऱ्या लसींचा साठा दोन नगांवर; रुग्णांनी उपचारासाठी कुठे धाव घ्यायची?
माहिती अधिकारातून प्राप्त औषधसाठ्याच्या नोंदवहीत (पुस्तक पान क्रमांक १४९ व इतर) खालील नोंदी आढळतात.
- Anti Rabies Vaccine – अवघे २ नग.
- Anti Snake Venom – अवघे २ नग.
- Inj. Anti-D Immunoglobulin – फक्त २ नग (पान क्रमांक १४४, दि. २८/०७/२०२६ रोजी प्राप्त झाल्याची नोंद).
- Inj. Neostigmine – केवळ ५ नग.
कुत्रा चावल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी नियोजित वेळापत्रकानुसार अनेक डोस आवश्यक असतात. अशा परिस्थितीत संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दोन लसी उपलब्ध असतील, तर अचानक अनेक रुग्ण आल्यास उपचारांची व्यवस्था कशी करणार? सर्पदंशाच्या रुग्णाला तातडीने उपचारांची गरज असताना केवळ दोन इंजेक्शनच्या साठ्यावर आरोग्य यंत्रणा कशी अवलंबून राहणार? हा केवळ आकड्यांचा प्रश्न नाही, तर आपत्कालीन आरोग्यसेवेच्या तयारीचा प्रश्न आहे.
२. हजारो औषधे मुदतबाह्य होण्याच्या नोंदी; औषध व्यवस्थापनाचा हिशेब कोण देणार?
जिल्हा परिषदेच्या ‘Proforma of Expiry’ या नोंदवहीतील प्रमाणित कागदपत्रांनुसार विविध औषधांच्या मुदतीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर नोंदी आढळतात.
- एप्रिल २०२६ – Inj. Noradrenaline व Adrenaline प्रत्येकी १०० नग.
- जुलै २०२६ – Syp. IFA च्या २१०० बाटल्या, Promethazine ३०० नग.
- ऑगस्ट २०२६ – Inj. Adrenaline १०० नग.
अशा विविध नोंदींमध्ये सुमारे ४५०० हून अधिक औषधे मुदतबाह्य होण्याच्या संदर्भात नमूद असल्याचा दावा माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांवरून करण्यात येत आहे.
मात्र, या औषधांचा प्रत्यक्ष वापर झाला की ती मुदतबाह्य झाली? मुदत संपण्यापूर्वी त्यांचे इतर आरोग्य केंद्रांमध्ये हस्तांतरण करण्यात आले का? मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट कशी लावण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभागाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुदतींच्या तारखा एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या असल्याने प्रत्यक्ष सद्यस्थितीची स्वतंत्र पडताळणी होणेही गरजेचे आहे.
३. नोंदवहीत औषधांचा तपशील, सरकारी पोर्टलवर ‘No Data Found’; हा नेमका घोळ काय?
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या (MMGPA) अधिकृत संगणकीय पोर्टलवरून प्राप्त अहवाल आणि प्रत्यक्ष नोंदवहीतील माहिती यांच्यात दिसणारी तफावत.
माहिती अधिकारातून मिळालेल्या पोर्टल अहवालात ३० एप्रिल, ३१ मे आणि ३० जून २०२६ पर्यंत मुदतबाह्य होणाऱ्या औषधांच्या संदर्भात ‘No Data Found’ अशी नोंद असल्याचे समोर आले आहे.
एका बाजूला हाताने लिहिलेल्या नोंदवहीत हजारो औषधांच्या मुदतीसंदर्भातील नोंदी आणि दुसऱ्या बाजूला सरकारी पोर्टलवर ‘No Data Found’! मग यापैकी नेमकी कोणती माहिती खरी आणि अद्ययावत आहे? औषधसाठ्याची माहिती पोर्टलवर वेळेत भरली जात नाही का? की नोंदी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतच गंभीर त्रुटी आहेत? या विसंगतीची चौकशी होणार की कागदोपत्री खुलासे करून प्रकरणावर पडदा टाकला जाणार?
दैनिक साईदर्शनचा थेट सवाल : सामान्य गोळ्यांचा साठा हजारोंमध्ये, मग जीव वाचवणाऱ्या इंजेक्शनची वानवा का?
Paracetamol, Amoxicillin यांसारख्या औषधांचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याच्या नोंदी असताना आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या रेबीज लसी, सर्पदंशावरील औषधे आणि Anti-D इंजेक्शनचा साठा इतका कमी का? औषधांची मागणी वेळेत केली जात नाही का? साठ्याचे नियोजन करणारे अधिकारी नेमके काय करतात? औषधे मुदतबाह्य होण्यापूर्वी त्यांचे योग्य वितरण करण्याची जबाबदारी कोणाची?
४. तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य प्रशासन गप्प का?
दाढ बु. प्राथमिक आरोग्य केंद्रातील या गंभीर बाबींची तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. औषधसाठ्याची प्रत्यक्ष तपासणी, पोर्टलवरील नोंदींची पडताळणी, मुदतबाह्य औषधांचा हिशेब आणि अत्यावश्यक इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी.
प्रशासनाला थेट सवाल आहे : रुग्णांना वेळेवर औषधे मिळाली नाहीत, तर या व्यवस्थेचा उपयोग काय? कागदावर आरोग्यसेवा उत्तम दाखवून प्रत्यक्षात रुग्णांना औषधांसाठी वणवण करायला लावायचे का?
या प्रकरणात केवळ कागदी चौकशी नको, तर प्रत्यक्ष औषधसाठ्याची तपासणी करून जबाबदारी निश्चित करावी. कारण सरकारी आरोग्य केंद्र हे गोरगरीब जनतेच्या विश्वासाचे ठिकाण आहे; तेथे औषधांचा तुटवडा आणि नोंदींमधील विसंगती यांना कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घेता येणार नाही.