शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्याची प्रतिमा गुन्हेगारी आणि अवैध व्यावसायिकांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी कठोर पावले उचलत असताना, शिर्डीतील काही पोलिसांच्या कथित भूमिकेमुळे या मोहिमेलाच हरताळ फासला जात असल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात रंगू लागली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कथित वाळू तस्करीला काही पोलिसांकडूनच अभय मिळत असल्याच्या चर्चेने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वीच्या पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी तसेच विविध अवैध व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर मोकळे रान मिळाल्याचे आरोप झाले होते. परिस्थिती बदलण्यासाठी तत्कालीन काळात खासदार नीलेश लंके यांनाही पाच दिवस आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरोधात मोठा असंतोष निर्माण झाल्याने बदल्याही झाल्या.
यानंतर घार्गे साहेबांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली. मात्र त्यांचीही अल्पावधीत बदली झाली. त्यानंतर जिल्ह्याला सुदर्शन पोलीस अधीक्षक लाभले आणि त्यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. गुटखा, दारू, अमली पदार्थ, वाळू तस्करी यांसह विविध बेकायदेशीर प्रकारांवर कारवाईचा धडाका सुरू केला.
मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या मोहिमेलाच शिर्डीतून काही पोलीस हरताळ फासत आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
शिर्डी परिसरात रात्रीच्या वेळी काही वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना कथितपणे मोकळीक दिली जात असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर काही पोलिसांच्या नातेवाईकांच्या नावावर डंपर घेऊन वाळू तस्करी केली जात असल्याच्या चर्चाही पोलीस वर्तुळात सुरू आहेत. या चर्चांमध्ये तथ्य किती आणि अफवा किती, हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होणे गरजेचे आहे.
दरम्यान, सध्या अहिल्यानगर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासारखे सक्षम अधिकारी लाभले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालून पोलिसांची प्रतिमा स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरू असताना, खात्यातीलच काही घटक या प्रयत्नांना सुरुंग लावत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
म्हणूनच पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ‘सुदर्शन चक्र’ फिरवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अपर पोलीस अधीक्षक वाकचौरे, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वाळू वाहतुकीपासून ते कथित हितसंबंधांपर्यंत संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी,
अशीही मागणी जोर धरत आहे.
अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असताना, जर पोलिसांच्याच छत्रछायेखाली अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळले, तर संबंधितांवरही कायद्याचा बडगा उगारला पाहिजे. अन्यथा अहिल्यानगरची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी घेत असलेली मेहनत काही मोजक्या पोलिसांच्या कथित कृत्यांमुळे व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त होत आहे.