अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नवनियुक्त सीईओंची शिर्डीत सदिच्छा भेट!
शिर्डी | प्रतिनिधी
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एअर मार्शल (निवृत्त) जितेंद्र मिश्रा यांनी सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साईचरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थानच्या विविध विभागांच्या कामकाजाची, प्रशासकीय नियोजनाची आणि आर्थिक व्यवस्थापनाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

जितेंद्र मिश्रा यांच्यासमवेत जगदीश आफळे, शुभ्रांशूजी आदी पदाधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पथकाचे स्वागत करून संस्थानच्या वतीने भाविकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थानच्या एकूण प्रशासकीय कामकाजाची आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या भेटीदरम्यान पथकाने संस्थानच्या विविध विभागांना भेट देत कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. यामध्ये साईभक्तांची दर्शन व्यवस्था, भक्तनिवास, प्रसादालय, आरोग्य सेवा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, देणगी व्यवस्थापन, भाविकांसाठीच्या विविध सेवासुविधा तसेच प्रशासकीय आणि आर्थिक नियोजन यांचा समावेश होता.
देणगी व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी
विशेष म्हणजे, पथकाने संस्थानच्या देणगी मोजणी केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. देणग्यांची मोजणी, वर्गीकरण, नोंदणी, सुरक्षितता आणि लेखांकन यांची कार्यपद्धती जाणून घेतली. संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे यांनी देणगी व्यवस्थापनासह लेखा शाखेतील विविध कामकाज, आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती पथकाला दिली.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावहे देखील उपस्थित होते.
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून दररोज लाखो साईभक्तांना दर्शनासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील भाविकांचे नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, आर्थिक पारदर्शकता, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांची माहिती या भेटीदरम्यान अयोध्येच्या पथकाने जाणून घेतली.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नवनियुक्त सीईओंची ही शिर्डी भेट धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनातील अनुभवांची देवाणघेवाण आणि प्रशासकीय कार्यपद्धती समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.