शिर्डी | प्रतिनिधी

शिर्डी नगरीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त येत असतात. या साईभक्तांची सेवा करणे हीच साईबाबांची खरी सेवा मानणाऱ्या शिर्डीतील एका सामान्य कामगाराने आपल्या असामान्य प्रामाणिकपणातून माणुसकीचा सुंदर आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
द्वारकामाई मंदिराजवळील श्री साई चैतन्य दुकानासमोर काम करणारे शिर्डी येथील रहिवासी श्री. संतोष पर्वत मोरे यांना आज एक सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. या मंगळसूत्राचे वजन सुमारे ५ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये होती. मात्र, एवढ्या किमतीचा सोन्याचा दागिना सापडल्यानंतरही त्यांनी क्षणाचाही मोह न ठेवता तो तातडीने साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केला.
दरम्यान, सुरत येथील साईभक्त श्रीमती हेमंती आशिष शर्मा यांचे मंगळसूत्र हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्या शोध घेत साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात पोहोचल्या. आवश्यक ओळख पटविल्यानंतर संतोष मोरे यांच्या हस्ते त्यांचे हरवलेले सोन्याचे मंगळसूत्र त्यांना परत करण्यात आले. आपला मौल्यवान दागिना सुखरूप परत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले.
मंगळसूत्र हरविणे हा अपशकुन मानला जातो; मात्र साईबाबांनीच आपले मंगळसूत्र पुन्हा मिळवून देत शुभशकुन केला, अशी भावनिक भावना श्रीमती शर्मा यांनी व्यक्त केली.
तासाला ७० रुपये कमाई; पण प्रामाणिकपणाची किंमत अनमोल!
विशेष म्हणजे, संतोष मोरे यांच्यासारखे अनेक शिर्डीतील ग्रामस्थ अवघ्या ७० रुपये प्रतितास या मोबदल्यावर काम करतात. दिवसाची मेहनत करून उदरनिर्वाह करणाऱ्या या सामान्य कामगाराने ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्याचा मोह न करता तो प्रामाणिकपणे परत केला. पैशापेक्षा माणुसकी आणि प्रामाणिकपणा मोठा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
साईभक्तांची सेवा करणे हीच साईबाबांची खरी सेवा आहे, या भावनेतून आपण हे काम केले, असे संतोष मोरे मानतात.
पोलीस प्रशासनाकडून प्रामाणिकपणाचा गौरव!
संतोष मोरे यांच्या या प्रामाणिक आणि कौतुकास्पद कार्याची दखल घेत शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मा. श्री. रणजित गलांडे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना केवळ दर्शनाचा आनंदच नव्हे, तर माणुसकी, विश्वास आणि प्रामाणिकपणाचा अनुभवही मिळतो, हे संतोष मोरे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. साईबाबांच्या नगरीतील खरा हिरा सोन्यात नसतो, तर तो अशा प्रामाणिक माणसांच्या मनात असतो!