शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा यांनी जोरदार हल्लाबोल केला असून, “रस्त्याचे श्रेय तुम्ही घेणार असाल, तर या रस्त्यावर मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मृत्यूची जबाबदारीही घ्या,” असा थेट सवाल त्यांनी विखे कुटुंबीयांना उद्देशून केला आहे.
शिर्डी, सावळीविहीर आणि राहाता परिसरातील नागरिक खड्डे व धुळीमुळे त्रस्त असल्याचे सांगत पिपाडा म्हणाले की, अधिकाऱ्यांशी संपर्क साधून किमान तात्पुरते डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राहाता शहरात डांबरीकरणाचा एक थर टाकण्यात आला, तर सावळीविहीर येथे रस्त्याचे काम सुरू झाले.

मात्र, एवढे काम सुरू होताच काही जणांकडून “आम्ही शब्द पाळला” असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका पिपाडा यांनी केली.
“पन्नास वर्षे सत्ता तुमच्या कुटुंबात होती. तुम्हीही पदावर होता. तरीही शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याचे काम पूर्ण करू शकला नाही. आता एखादे छोटे काम सुरू झाले म्हणून ‘आम्ही शब्द पाळला’ असे म्हणण्याची हिंमत कशी होते?” असा सवाल पिपाडा यांनी केला.
रस्त्यावर झालेल्या अपघातांचा संदर्भ देत त्यांनी या मार्गावरील परिस्थितीवरही तीव्र चिंता व्यक्त केली. देहऱ्याजवळ झालेल्या पती-पत्नीच्या भीषण अपघाताचा तसेच राहुरीजवळ दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याचा उल्लेख करत, “रस्त्याची दुरवस्था आणि अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नाही,” असे ते म्हणाले.
‘श्रेय नको, आधी जबाबदारी घ्या!’
शिर्डी–अहिल्यानगर रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय कोणाला मिळणार, यापेक्षा या मार्गावर झालेल्या जीवितहानीची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे पिपाडा यांनी म्हटले.
“शिर्डी–अहिल्यानगर रस्ता पूर्ण झाल्यावर त्याचे श्रेय तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला कधीच मिळणार नाही. जर जबाबदारी घ्यायचीच असेल, तर या रस्त्यावर बळी गेलेल्या हजारो लोकांच्या मृत्यूची जबाबदारी घ्या,” असा घणाघाती टोला राजेंद्र पिपाडा यांनी लगावला.
रस्त्याच्या कामाचे राजकीय श्रेय घेण्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे.
पिपाडांचा थेट सवाल…
“रस्त्याचे श्रेय घ्यायचे असेल तर घ्या; पण या रस्त्यावर मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या मृत्यूची जबाबदारीही स्वीकारा. श्रेयाची भाषा करण्यापूर्वी जनतेच्या जीवाची किंमत समजून घ्या!”