शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात आरोपी सागर बेग याला अखेर न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. २९ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेला अंतरिम जामीन न्यायालयाने रद्द केला असून, Criminal Bail Application No. 210/2026 देखील फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सागर बेगच्या कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत.
न्यायालयाच्या आदेशात FIR मधील गंभीर आरोपांचा स्पष्टपणे विचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीने स्वतः दाखल केलेल्या disclosure affidavit मध्ये त्याच्यावर २५ गुन्हेगारी पूर्वइतिहास असल्याची नोंद असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. यातील काही प्रकरणांत तो निर्दोष मुक्त झाल्याचेही आदेशात नमूद आहे.
फिर्यादी महिलेने अटकपूर्व जामिनाला हरकत नसल्याचे सांगितले असले, तरी केवळ त्या संमतीच्या आधारावर जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. FIR मधील आरोपांचे गांभीर्य, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या प्रकरणातील पिस्तूल अद्याप हस्तगत झालेले नसल्याची बाब न्यायालयाने महत्त्वाची मानली.
फिर्यादी महिलेच्या संमतीबाबतही न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. पेनड्राईव्हमधील व्हिडिओ, पोलिसांचे जबाब आणि फिर्यादीच्या आईचा दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्यात आलेला जबाब यांचा विचार करता, फिर्यादी महिलेने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र स्वेच्छेने करण्यात आले आहे का, याबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केली आहे. तिला प्रभावित केले जात असल्याची किंवा साक्षीदारांमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पिस्तूल अद्याप पोलिसांच्या हाती नाही!
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल अद्याप हस्तगत झालेले नसल्याचे न्यायालयाच्या आदेशातून समोर आले आहे. आरोपी न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांसमोर हजर झाला असला, तरी तपासात त्याने अपेक्षित सहकार्य केले नसल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या पार्श्वभूमीवर आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
बचाव पक्षाचा युक्तिवादही न्यायालयासमोर
आरोपीच्या वतीने अॅड. श्रीवास्तव यांनी २९ ऑगस्ट रोजी युक्तिवाद करताना आरोपी क्रमांक १ बाबू साळवे आणि फिर्यादी महिलेतील कथित १२ वर्षांच्या संबंधांचा संदर्भ दिला होता. सागर बेगला जाणीवपूर्वक गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा बचाव पक्षाने केला होता. तसेच FIR मधील आरोप कथित घटनेशी सुसंगत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता.
मात्र न्यायालयाने FIR मधील गंभीर आरोप, आरोपीचा गुन्हेगारी पूर्वइतिहास, पिस्तूल अद्याप न सापडणे आणि तपासातील सहकार्याबाबत नोंदविलेल्या बाबींचा विचार करून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
न्यायालयाचा स्पष्ट आदेश
“Criminal Bail Application No. 210/2026 is rejected,” असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यासोबत २९ ऑगस्ट २०२६ रोजी मंजूर करण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करण्यात आला आहे. सीलबंद पाकीट आणि केस डायरी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे परत करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.
आता या प्रकरणात पुढील कायदेशीर लढाई कोणत्या दिशेने जाते, तसेच पोलिसांच्या तपासात पिस्तूल आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत होतात का, याकडे लक्ष लागले आहे.
२५ गुन्ह्यांचा पूर्वइतिहास; पिस्तूल अद्याप बेपत्ता!
सागर बेगच्या जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी पक्षाने आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुद्दा न्यायालयासमोर ठेवला. आरोपीच्या disclosure affidavit मध्ये २५ गुन्हेगारी पूर्वइतिहास असल्याची नोंद असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. त्यातील काही प्रकरणांत निर्दोष मुक्तता झाल्याचेही आदेशात स्पष्ट आहे. त्यातच या गुन्ह्यातील पिस्तूल अद्याप हस्तगत झालेले नसल्याने तपासासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे तात्पुरत्या जामिनावर असलेल्या सागर बेगला अखेर न्यायालयीन आदेशाचा मोठा धक्का बसला आहे.