राहाता | प्रतिनिधी
राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत विनाक्रमांकाचा टाटा ९१२ डंपर आणि वाळू असा तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात डंपर चालकासह शिर्डीतील विकास गोंदकर यांच्याविरुद्धही कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास गोंदकर हे शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असून, ते माजी खासदार सुजय विखे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात मानले जाते. त्यामुळे या कारवाईने शिर्डीच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री वाळू वाहतूक; पोलिसांचा सापळा
अप्पर पोलीस अधीक्षक सोमणाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार पोलिसांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पुणतांबा गावाकडून राहात्याकडे विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी आशाकेंद्र चौक, पुणतांबा येथे सापळा रचला. ३ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १२.४० वाजता संशयित डंपर पोलिसांनी अडवला.
डंपरची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीचा वैध परवाना आहे का, अशी विचारणा केली असता चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
चालकाच्या जबाबातून मालकाचे नाव; दोघांवर गुन्हा
पोलिसांनी चालक सुनिल भिमा पवार (वय ४६, रा. पिंपळवाडी, ता. राहाता) याची चौकशी केली. त्यावेळी डंपरचा मालक विकास गोंदकर, रा. शिर्डी असल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. डंपरमध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू असल्याचे पंचनाम्यात नमूद असून, वाळूची अंदाजे किंमत १५ लाख रुपये, तर डंपरची किंमत सुमारे २० हजार रुपये, असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३(५) व ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास राहाता पोलीस करीत आहेत.
वाळू तस्करीला राजकीय पाठबळाचा प्रश्न?
राहाता-पुणतांबा परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा सातत्याने चर्चेत असताना आता शिर्डीतील राजकीयदृष्ट्या वजनदार व्यक्तीचे नाव असलेल्या वाहनावर कारवाई झाल्याने अवैध वाळू वाहतुकीच्या या नेटवर्कमागे नेमके कोण आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.