
शिर्डी | प्रतिनिधी
दहा वर्षे सेवा करूनही कायम सेवेत समाविष्ट होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आता आपल्या न्याय्य हक्कांसाठी थेट संविधानाचा मार्ग स्वीकारला आहे. डोक्यावर भारतीय संविधान घेऊन शिर्डी ते मुंबईतील चैत्यभूमी अशी पायी दिंडी काढत संस्थान प्रशासन आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता श्री साईबाबा मंदिर परिसरातील गेट क्रमांक ४ येथून या ऐतिहासिक पायी दिंडी आंदोलनाला प्रारंभ होणार आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आदेश दिला आहे. या न्यायालयीन आदेशाची संस्थान प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी आणि दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
या मागणीसाठी संस्थान कंत्राटी कर्मचारी अशोक लोंढे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने या पायी दिंडीत सहभागी होणार आहेत. प्रारंभी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन, डोक्यावर भारतीय संविधान घेऊन ही दिंडी शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
६ डिसेंबरला चैत्यभूमीवर अभिवादन करून सांगता!
शिर्डीतून सुरू होणारी ही पायी दिंडी दि. ६ डिसेंबर २०२६ रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे पोहोचणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे. डोक्यावर संविधान आणि मनात न्यायाची अपेक्षा घेऊन निघालेली ही दिंडी कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचे प्रतीक ठरणार आहे.
न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शासनाचे लक्ष!
या आंदोलनासंदर्भात श्री साईबाबा संस्थान प्रशासन, शिर्डी पोलीस स्टेशन, राज्याचे मुख्यमंत्री तसेच अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत. दहा वर्षे संस्थानमध्ये सेवा बजावल्यानंतरही कायम सेवेचा प्रश्न प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क द्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
विशेष म्हणजे, या आंदोलनात कोणताही संघर्षाचा मार्ग न स्वीकारता लोकशाही, शांतता आणि संविधानिक मूल्यांच्या आधारे न्याय मागण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शिर्डीतून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत निघणारी ही संविधान दिंडी केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नापुरती मर्यादित न राहता न्याय, हक्क आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारी ठरणार आहे.
आता संस्थान प्रशासन या कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.