शिर्डी | प्रतिनिधी : साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दर्शन आटोपून भक्तनिवासाकडे परतणाऱ्या आंध्र प्रदेशातील महिलेच्या गळ्यातील तब्बल ३२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ९ ऑगस्ट) रात्री घडली. चोरीस गेलेल्या सोन्याची किंमत तब्बल २ लाख ३० हजार रुपये असल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे.
विजयवाडा येथील ४६ वर्षीय महिला आपल्या पती व नातेवाईकांसह शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आली होती. रात्री सुमारे १०.४५ वाजता दर्शन आटोपून श्री साईबाबा आश्रम भक्तनिवासाच्या १००० रूम गेटजवळून सर्वजण पायी जात होते. त्याचवेळी पाठीमागून बजाज पल्सर मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसम आले.
दोन्ही चोरट्यांनी डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर काळा रुमाल बांधून ओळख लपवली होती. मोटरसायकलवर मागे बसलेल्या चोरट्याने अचानक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जोरात हिसकावून तोडली. काही कळायच्या आत दोन्ही चोरटे मोटरसायकलवरून नगर-मनमाड रोडने कोपरगावच्या दिशेने भरधाव पसार झाले.
अचानक झालेल्या या प्रकाराने महिला आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. परिसरात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तोपर्यंत चोरटे दूर पळून गेले होते.
या घटनेप्रकरणी महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
भाविकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह!
शिर्डीत देशभरातून दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत भक्तनिवासाच्या परिसरातच लाखो रुपयांच्या सोन्याची चैन हिसकावली जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे. यापूर्वीही गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवून चोरट्यांच्या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.