
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीच्या साईभूमीतून पुन्हा एकदा भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम अनुभवण्याची संधी साईभक्तांना लाभणार आहे. साईनिर्माण ग्रुप, साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत पशुपतिनाथ (नेपाळ), काशी विश्वनाथ आणि प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या या पवित्र तीर्थक्षेत्रांची भव्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, श्री साईबाबांच्या पवित्र पालखीच्या सान्निध्यात होणारी ही यात्रा यंदा बारा ज्योतिर्लिंग यात्रेच्या १२ वर्षांच्या यशस्वी प्रवासाची सांगता करणारी अखेरची यात्रा ठरणार असल्याने देशभरातील साईभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रवासात श्री साईबाबांची पवित्र पालखी, अखंड साईनामाचा गजर, भजन-कीर्तन, सामूहिक आरती आणि भक्तिमय वातावरण. त्यामुळे ही यात्रा केवळ धार्मिक पर्यटन न राहता प्रत्येक भाविकासाठी एक सामूहिक आध्यात्मिक साधना ठरते. हजारो साईभक्त साईनामाच्या गजरात आणि साईबाबांच्या कृपेच्या अनुभूतीत हा संपूर्ण प्रवास पूर्ण करतात.
साईबाबांच्या “सबका मालिक एक” आणि सर्वधर्मसमभाव या संदेशाला कृतीत उतरविण्याच्या उद्देशाने साईनिर्माण ग्रुपचे संस्थापक विजयराव कोते पाटील, साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलास कोते, शिर्डी ग्रामस्थ तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सातत्याने राबविण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य भाविकांनाही अत्यल्प खर्चात देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडावे, हीच या उपक्रमामागील प्रेरणा राहिली आहे.
गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत तब्बल २५ हजारांहून अधिक साईभक्तांना भारतातील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविण्याचा मान या उपक्रमाने मिळविला आहे. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वरम् आणि घृष्णेश्वर या सर्व पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शन हजारो भाविकांना नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देत या उपक्रमाने सेवाभावाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमातील अनेक यात्रा इतिहास घडविणाऱ्या ठरल्या आहेत. २०१६ मध्ये बद्रीनाथ–केदारनाथ यात्रेसाठी विमानसेवेची व्यवस्था करण्यात आली होती, तर १५० लक्झरी बसमधून सुमारे ६,५०० भाविकांना काशी यात्रेचा लाभ देण्यात आला होता. नियोजन, शिस्त आणि सेवाभाव यामुळे या यात्रांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत गेला.
साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टने केवळ तीर्थयात्रांपुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. गेल्या २६ वर्षांपासून आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २,५०० जोडप्यांचे विवाह लावून देत तितक्याच मुलींचे कन्यादान करण्यात आले आहे. सामाजिक समरसता, सर्वधर्मीय ऐक्य आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम राज्यभरात प्रेरणादायी ठरला असून यंदा त्याने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
दिल्लीचे साईभक्त अनिल कामरा यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “साईसच्चरित्र पारायण करणाऱ्या भाविकांना बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा घडविणे, यात्रेदरम्यान साईबाबांच्या पालखीचे पवित्र सान्निध्य लाभणे आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाहासारखे समाजहिताचे उपक्रम राबविणे, हे कोते बंधू आणि शिर्डी ग्रामस्थांचे कार्य खऱ्या अर्थाने अद्वितीय आहे. त्यांनी साईबाबांचा सर्वधर्मसमभावाचा संदेश सेवा, संस्कार आणि समाजकार्याच्या माध्यमातून देशभर पोहोचविला आहे.”
यंदाची पशुपतिनाथ–काशी–अयोध्या यात्रा ही बारा ज्योतिर्लिंग यात्रेच्या गौरवशाली प्रवासाचा समारोप करणारी ठरणार असल्याने राज्यासह देशभरातील साईभक्तांमध्ये या यात्रेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. साईबाबांच्या पवित्र पालखीच्या सान्निध्यात अखेरच्या या आध्यात्मिक यात्रेचा लाभ घेण्यासाठी विक्रमी संख्येने भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे
१२ वर्षांचा सेवाभावाचा सुवर्णप्रवास
२९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर – पशुपतिनाथ, काशी व अयोध्या यात्रा
१२ वर्षांत २५ हजारांहून अधिक भाविकांना बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन
साईबाबांच्या पवित्र पालखीसह होणारी देशातील वैशिष्ट्यपूर्ण तीर्थयात्रा
१५० लक्झरी बसमधून ६,५०० भाविकांना काशी यात्रा
बद्रीनाथ–केदारनाथ यात्रेसाठी विमानसेवेची सुविधा
२६ वर्षांत २,५०० सर्वधर्मीय सामुदायिक विवाह
नाममात्र शुल्कात आध्यात्मिक सेवा आणि समाजसेवेचा आदर्श