
अहिल्यानगर | प्रतिनिधी
ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासावरून अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा श्रेयवादाची ठिणगी पडली असून, खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना थेट लक्ष्य केले आहे. “भुईकोट किल्ल्याचे श्रेय घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. मी या विषयाचा संसदेत सातत्याने पाठपुरावा केला असून माझ्याकडे त्याचा संपूर्ण पत्रव्यवहार आहे,” असा जोरदार दावा लंके यांनी केला.
किल्ल्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी केवळ पाहणी दौरे आणि फोटोसेशन पुरेसे नसते, असा टोला लगावत लंके म्हणाले, “नुसता फोटो नाही, माझ्याकडे त्या तारखेचा पत्रव्यवहार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिले. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. कुणी श्रेय घेत असेल तर आधी आपला पत्रव्यवहार दाखवावा.”
‘काम माझे, श्रेय दुसऱ्याचे’ चालणार नाही!
विखे यांचे नाव न घेता लंके यांनी त्यांच्या राजकीय कार्यपद्धतीवरच जोरदार हल्ला चढवला. “चांगले झाले की आमच्यामुळे झाले आणि वाईट झाले की निलेश लंकेमुळे झाले, ही सवय बंद झाली पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.
“प्रयत्न केला असेल तर पुरावे दाखवा. केवळ पुढे पुढे करून श्रेय घेण्याची गरज नाही. मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे,” असे सांगत लंके यांनी विखेंना अप्रत्यक्ष आव्हानच दिले.
पद नसताना अधिकाऱ्यांच्या बैठका कशासाठी?
भुईकोट किल्ल्याच्या विषयावर पद नसलेल्या व्यक्तींनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणणे योग्य नसल्याचेही लंके यांनी सुनावले.
“ज्याला कोणतेही पद नाही, त्याने अधिकाऱ्यांची बैठक घेतली तर ते चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनीही कोणाच्या दबावाला किंवा आमिषाला बळी पडायचे की नाही, याचा विचार केला पाहिजे,” असे लंके म्हणाले.
‘नुसत्या फोटोने इतिहास बदलत नाही!’
भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या इतिहासाची ओळख आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या विकासकामाचे राजकीय श्रेय घेण्यासाठी सुरू असलेली धडपड नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. लंके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विखे विरुद्ध लंके संघर्षाला पुन्हा एकदा धार आली आहे.
पत्रव्यवहार, तारीख आणि पाठपुराव्याचे पुरावे समोर आणा; केवळ फोटो काढून श्रेय लाटू नका, असा थेट संदेशच खासदार लंके यांनी माजी खासदार विखे यांना दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

