शिर्डी | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या राहिलेल्या सहकारी संस्थेत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार अपेक्षित असताना शिर्डी विकास कार्यकारी सोसायटीच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोसायटीचे सचिव संदिप नामदेव बडे हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप सभासद व शेतकऱ्यांनी केला असून, त्यांच्या दीर्घकाळच्या कार्यकाळामुळे संस्थेच्या कारभारात ‘एकाच व्यक्तीचे वर्चस्व’ निर्माण झाल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.
या कथित मनमानी कारभाराविरोधात अखेर संतप्त सभासद व शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राहाता यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सचिवांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
युरिया खत वाटपातही सावळागोंधळाचा आरोप
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया खताच्या वितरणात पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. पात्र शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होण्याऐवजी मनमानी पद्धतीने वितरण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘एकेरी भाषे’वरून संताप
सचिव बडे हे सभासद व शेतकऱ्यांशी अरेरावीच्या आणि उद्धट पद्धतीने बोलत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अनेक सभासदांना एकेरी भाषेत बोलले जाते, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी शिर्डीतील शेतकरी हरिभाऊ कोते यांच्यासोबतही बडे यांनी उद्धट भाषेत वाद घातल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी कोते यांनी सचिवांची बदली करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यानंतरही बदली न झाल्याने ‘इतक्या तक्रारीनंतरही सचिवांची खुर्ची का हलत नाही?’ असा सवाल आता सभासदांमधून उपस्थित होत आहे.
दहा-बारा वर्षांचा मुक्काम; चौकशीची मागणी
एकाच ठिकाणी प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या सचिवांच्या संपूर्ण कार्यकाळातील प्रशासकीय व आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी सभासदांनी केली आहे. त्यासाठी विशेष लेखापरीक्षण करून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसह खत वितरण, खरेदी-विक्री, नोंदवही, ठराव आणि अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करून सचिवांची तातडीने अन्यत्र बदली करावी आणि चौकशीत दोष आढळल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे.
‘मलिदा’ कोणाच्या आशीर्वादाने?
सोसायटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना ‘एकाच व्यक्तीला इतकी वर्षे एकाच खुर्चीवर कोणाच्या आशीर्वादाने बसवले जाते?’ असा थेट सवाल सभासदांनी उपस्थित केला आहे. आर्थिक किंवा प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचा अंतिम निष्कर्ष चौकशीपूर्वी काढता येणार नसला, तरी तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण कारभाराची तपासणी करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आता सहाय्यक निबंधकांची भूमिका निर्णायक!
सभासद आणि शेतकऱ्यांनी अधिकृतपणे तक्रार दाखल केल्यानंतर सहाय्यक निबंधक या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतात, चौकशीचे आदेश दिले जातात का आणि दोष आढळल्यास कोणावर कारवाई होते, याकडे शिर्डी परिसराचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सचिवांच्या कारभाराला कुणी पदाधिकारी किंवा अन्य व्यक्तींचे संरक्षण अथवा साथ असल्याचा आरोपही तक्रारदारांकडून केला जात आहे. त्यामुळे ‘सचिवांची खुर्ची वाचवण्यासाठी पडद्यामागून कोण धाव घेत आहे?’ याचाही तपास करावा, अशी मागणी पुढे येत आहे.
आता चौकशी झाली तरच शिर्डी विकास कार्यकारी सोसायटीतील कारभाराची खरी बाजू समोर येणार आहे. त्यामुळे सहाय्यक निबंधक कार्यालय या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
