
शिर्डी प्रतिनिधी
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या साईबाबांनी अन्नदानाला सर्वोच्च स्थान दिले आहे. दरवर्षी कोट्यवधी साईभक्त ज्या साईप्रसाद भोजनालयात भोजन करून समाधान व्यक्त करतात, तसेच ज्याचा गौरव स्वतः महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही केला आहे, अशा साईबाबा संस्थानच्या साईप्रसाद भोजनालयाची किरकोळ कारणावरून सोशल मीडियावर बदनामी करणे अयोग्य आणि मनाला न पटणारे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी व्यक्त केली.
कोते म्हणाले की, शिर्डीत वर्षाकाठी कोट्यवधी साईभक्त दर्शनासाठी येतात. साईप्रसाद भोजनालयात भोजन करून अनेक भाविक समाधान व्यक्त करतात. साईबाबांनी आपल्या आयुष्यात अन्नदानाला विशेष महत्त्व दिले असून, त्याच परंपरेतून लाखो भाविक दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अन्नदान करतात. या सेवेमुळे भक्तांना पुण्य आणि आत्मिक समाधान लाभत असते.
अशा परिस्थितीत भरत मोरे यांनी भोजनालयातील किरकोळ घटनेचे सोशल मीडियावर भांडवल करून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कोते यांनी म्हटले. भोजनालयातील कर्मचाऱ्यांची शिफ्ट बदलत असताना काही गैरसमज निर्माण झाला असेल, परंतु त्यावर थेट कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, त्यांची ओळखपत्रे पाहण्याचा प्रयत्न करणे, नाव विचारून अपशब्द वापरणे ही बाब योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोते यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांनीही साईप्रसाद भोजनाचा लाभ घेतल्याची आठवण करून दिली. “मोरे यांना काही तक्रार असेल तर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडली असती, तर संस्थानने त्यातील त्रुटी निश्चितच दूर केल्या असत्या. मात्र, सोशल मीडियावर सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
दररोज सुमारे ६० ते ७० हजार, तर सुट्टीच्या दिवशी जवळपास एक लाख भाविकांना भोजन देण्याची जबाबदारी साईप्रसाद भोजनालय पार पाडत असते. एवढ्या मोठ्या व्यवस्थेत किरकोळ त्रुटी राहू शकतात, मात्र त्यावरून संपूर्ण संस्थानची बदनामी करणे योग्य नसल्याचा सवालही कोते यांनी उपस्थित केला.
साईप्रसाद भोजनालयातील सेवाभावी कर्मचाऱ्यांपैकी काहींचा राष्ट्रपती भवनात सन्मान झाला आहे. अशा सेवकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न खेदजनक असल्याचे सांगत, “भरत मोरे हे आमचे मित्र असून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. त्यांनी केलेला प्रकार लाखो साईभक्तांच्या भावना दुखावणारा आहे,” अशी खंतही कोते यांनी व्यक्त केली.

