
शिर्डी प्रतिनिधी : देश-विदेशातून लाखो साईभक्त दरवर्षी शिर्डीत येऊन साईबाबांना पेढ्यांचा प्रसाद अर्पण करतात. मात्र, याच साईभक्तांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ करणारा निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा गोरखधंदा शिर्डीत राजरोसपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शिर्डीतील अनेक दुकानांमधून पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र, नमुने घेऊन अनेक महिने उलटूनही अद्याप अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे एफडीएची कारवाई ही केवळ दिखावा तर नाही ना, असा सवाल आता नागरिक आणि साईभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.
नमुने घेतल्यानंतर संबंधित विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने शहरात निकृष्ट व संशयित पेढ्यांची विक्री आजही बिनधास्तपणे सुरू आहे. दररोज हजारो साईभक्त हेच पेढे प्रसाद म्हणून खरेदी करीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यभरात भेसळविरोधी मोहिमेचा गाजावाजा होत असताना शिर्डीत मात्र भेसळखोरांना अभय मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नमुने घेतल्यानंतरही अहवाल वेळेत न आल्याने दोषींवर कारवाई लांबणीवर पडत आहे आणि याचाच फायदा घेऊन काही विक्रेते भाविकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप होत आहे.
शिर्डीसारख्या जागतिक तीर्थक्षेत्रात प्रसादाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून, एफडीएने तत्काळ तपास अहवाल जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
“साईभक्तांच्या श्रद्धेचा बाजार?”
पेढ्यांचे नमुने घेऊन महिने उलटले, अहवाल मात्र गुलदस्त्यात
कारवाई नसल्याने भेसळखोरांचे मनोबल वाढले
प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ
एफडीएच्या कारवाईवर नागरिकांकडून संशय
दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी

