
शिर्डी प्रतिनिधी ,/ साईनगरी शिर्डीत सुरक्षेचे तीन-तीन स्तर, कोट्यवधींचे सीसीटीव्ही कॅमेरे, स्वतंत्र पोलीस यंत्रणा, वाहतूक शाखा, संस्थान सुरक्षा आणि स्थानिक गुन्हे शाखेचा तगडा फौजफाटा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असतानाही चोरटे मात्र पोलिसांना उघडपणे सलामी ठोकत फिरत असल्याचे चित्र साईनगरी शिर्डीत दिसत आहे. म्हाळोबा मंदिर शेजारील मुख्य आणि कायम वर्दळीच्या रस्त्यावर १९ मे रोजी रात्रीच्या ८वाजेच्या सुमारास एका महिला साईभक्तेच्या गळ्यातील तब्बल आठ तोळ्यांची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने काही सेकंदांत हिसकावून नेल्याने शिर्डीत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तामीळनाडूतील कोईमतूर येथील सौ. शिला या महिला साईभक्त आपल्या कुटुंबासह शिर्डीत दर्शनासाठी आल्या होत्या. रात्री खरेदीसाठी बाहेर पडलेल्या या कुटुंबातील सदस्य पुढे असताना शिला आणि त्यांचे पती रस्त्याने पायी चालत होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने “पत्ता विचारायचा आहे” असा बहाणा करत क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील सोन्याची जाड साखळी हिसकावून पोबारा केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला.
चोरीस गेलेली साखळी तब्बल ८० ग्रॅम वजनाची म्हणजेच सुमारे आठ तोळ्यांची असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. बाजारभावानुसार या दागिन्याची किंमत १२ लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. भररस्त्यात, लोकांच्या वर्दळीत आणि कुटुंबासोबत असताना घडलेल्या या घटनेमुळे महिला साईभक्तेला मोठा मानसिक धक्का बसला असून त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हेल्मेट घातल्याने आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याचे समजते. मात्र प्रश्न असा उपस्थित होत आहे की, शिर्डीत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा नेमकी काम करते कुठे? गेल्या काही महिन्यांपासून शहरात चैन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, संशयित हालचालींच्या घटना सातत्याने समोर येत असताना चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे शिर्डीत श्री साईबाबा संस्थानची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा, वाहतूक पोलीस, नगर परिषदेची सुरक्षा यंत्रणा, शिर्डी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अशी अनेक स्तरांवरील सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात आहे. मात्र तरीही चोरटे राजरोसपणे मुख्य रस्त्यांवर गुन्हे करून पसार होत असल्याने “नेमकी जबाबदारी कोणाची? या चोरट्यांनी नुतन जिल्हा पोलीस प्रमुख मुम्मका सुदर्शन यांना एक प्रकारे सलामीच शिर्डीतुन दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक हे साईभक्त असल्याने त्यांच्या भुमिकेकडे लोकांचे लक्ष लागले आहे
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ‘व्यावसायिक कौशल्यावर’ देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. कारण वारंवार घडणाऱ्या चैन स्नॅचिंगच्या घटनांमुळे चोरट्यांचे जाळे सक्रिय असल्याचे स्पष्ट होत असताना अद्याप कोणतीही मोठी कारवाई किंवा टोळीचा पर्दाफाश झालेला दिसून आलेला नाही. “चोरटे एक पाऊल पुढे आणि यंत्रणा दहा पावले मागे” अशी संतप्त चर्चा शहरात रंगू लागली आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी मुख्य रस्ते, मंदिर परिसर आणि गर्दीच्या भागात पोलीस गस्त वाढवावी, हेल्मेट व मास्क घालून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची कसून चौकशी करावी, तसेच CCTV नियंत्रण कक्ष अधिक प्रभावी करावा, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
साईनगरीतील वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेनेचा संताप 🚨
शिर्डी शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरी, चैन स्नॅचिंग आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक व साईभक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भररस्त्यात महिला साईभक्तेची आठ तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून नेण्याच्या घटनेनंतर शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
“शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्चून CCTV यंत्रणा उभारण्यात आली, विविध सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत, तरीही चोरटे भररस्त्यात गुन्हे करून पसार होत आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे,” असे कमलाकर कोते पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच नुकतेच पदभार स्वीकारलेल्या नूतन पोलीस अधीक्षकांनी शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीकडे आणि सक्रिय चोरट्यांकडे विशेष लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. “साईनगरीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे. अन्यथा शिर्डीची प्रतिमा मलीन होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवणे, संशयित दुचाकीस्वारांची तपासणी, CCTV नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करणे आणि सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

