श्री साईबाबांच्या पावन नगरीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उत्साह संचारला असून, श्री साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील क्रीडांगणावर १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या ७० व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. देशभरातील ६२ संघांमधील ८५० हून अधिक युवा खेळाडूंच्या सहभागामुळे शिर्डीच्या क्रीडांगणावर राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा उत्सव रंगणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास नाशिकचे आमदार राहुल ढिकले, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, नगरसेवक, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साई क्रीडा ज्योतीने वाढविला सोहळ्याचा उत्साह!
राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने सकाळी श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातून साई क्रीडा ज्योत आणण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या क्रीडा ज्योतीचे स्वागत करून ती प्रज्वलित केली. क्रीडा भावना, खिलाडूवृत्ती, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या ज्योतीने उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
देशभरातील ६२ संघांचा सहभाग
दि. २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये मुलांचे ३२ आणि मुलींचे ३० असे एकूण ६२ संघ सहभागी झाले आहेत. देशातील विविध राज्यांतून ८५० हून अधिक खेळाडूंसह दीडशेहून अधिक प्रशिक्षक व सहकारी शिर्डीत दाखल झाले आहेत. युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची मोठी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
खेळाडूंसाठी संस्थानकडून चोख व्यवस्था
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या निवास, भोजन, वाहतूक तसेच अन्य आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी चार स्वतंत्र व सुसज्ज क्रीडांगणे तयार करण्यात आली असून, सहभागी खेळाडूंना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संस्थान प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.
शिर्डीकरांना राष्ट्रीय क्रीडा सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन
या स्पर्धेमुळे शिर्डी नगरीत क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेचा शिर्डीकरांसह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
या संपूर्ण आयोजनासाठी श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ आणि क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र कोहकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे सदस्य स्पर्धेच्या व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
श्री साईबाबांच्या पवित्र भूमीत देशभरातील युवा खेळाडूंचे कौशल्य, जिद्द आणि खिलाडूवृत्ती अनुभवण्याची संधी शिर्डीकरांना मिळणार असून, ही राष्ट्रीय स्पर्धा शिर्डीच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने निश्चितच अभिमानास्पद ठरणार आहे.