दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरात दुकान चालवायचे असेल तर दररोज ५०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करून दुकानदाराला धमकावल्याचा तसेच त्यानंतर रस्ता अडवून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दुकान सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप
फिर्यादी विनोद गणेश गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या ‘साईचरण’ नावाच्या फुल व रोज विक्रीच्या दुकानात असताना मंगेश वामन त्रिभुवन आणि त्याचा भाऊ राजेंद्र वामन त्रिभुवन हे तेथे आले. दुकान सुरू ठेवायचे असेल तर दररोज ५०० रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच पैसे न दिल्यास दुकान चालू देणार नाही, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकाराची माहिती फिर्यादीने आपल्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास संबंधितांना या घटनेची माहिती मिळाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रस्ता अडवून मारहाण केल्याची फिर्याद
त्यानंतर फिर्यादी दुचाकीवरून शिर्डी पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यासाठी जात असताना लक्ष्मीनगर चौक परिसरात पाच जणांनी त्यांचा रस्ता अडविल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी मंगेश त्रिभुवन याने कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा, तर विशाल रमेश त्रिभुवन याने डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत केल्याचा आरोप आहे. आकाश रमेश त्रिभुवन यानेही मारहाण केल्याचे, तर प्रदीप राजेंद्र त्रिभुवन याने डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
या झटापटीत फिर्यादीच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
रुग्णालयात उपचार; वैद्यकीय प्रमाणपत्रानंतर तक्रार
मारहाणीत डाव्या हाताच्या मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादीने वैद्यकीय उपचार घेतले. ग्रामीण रुग्णालय, राहाता येथून वैद्यकीय मेमो मिळाल्यानंतर त्यांना श्री साईबाबा रुग्णालय, शिर्डी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पाच जणांविरुद्ध कारवाई
या प्रकरणात मंगेश वामन त्रिभुवन, राजेंद्र वामन त्रिभुवन, विशाल रमेश त्रिभुवन, आकाश रमेश त्रिभुवन आणि प्रदीप राजेंद्र त्रिभुवन या पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
दुकान सुरू ठेवण्यासाठी दररोज पैशांची मागणी केल्याचा आणि त्यानंतर दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
