
शिर्डी | प्रतिनिधी :
साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. मात्र, साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता साईभक्तांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. चावडी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मारुती मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या एका साईभक्त महिलेला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
साईबाबांच्या पावन भूमीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुत्र्यांच्या दहशतीतून मार्ग काढावा लागत असेल, तर शिर्डीची ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांमधून व्यक्त होत आहे.
आधीच दिला होता इशारा; तरीही उपाययोजना का नाही?
शिर्डीचे भूमिपुत्र आणि साईभक्त हरिभाऊ कोते यांनी यापूर्वीच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याचा मुद्दा उपस्थित करून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, असा आरोप आता केला जात आहे.
धोक्याची पूर्वसूचना असतानाही उपाययोजना का करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
संस्थान आणि नगरपरिषद जबाबदारी झटकणार का?
साईबाबा संस्थान परिसरात दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते. दुसरीकडे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. अशा परिस्थितीत साईभक्त महिलेवर कुत्र्याने हल्ला केल्यानंतर आता तरी श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद जागी होणार का?
भाविकांच्या सुरक्षेसाठी केवळ दर्शन व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि स्वच्छता पुरेशी नाही; मंदिर परिसरातील भटक्या प्राण्यांपासून भाविकांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार का?
आज एका महिलेला कुत्र्याने चावा घेतला आहे. उद्या एखाद्या लहान मुलावर, वृद्ध भाविकावर किंवा परराज्यातून आलेल्या भक्तावर गंभीर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी कोणाची?
दुर्घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मंदिर परिसर, चावडी परिसर, मारुती मंदिर परिसर तसेच भाविकांची मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक साई दर्शनचा सवाल
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरण देणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी नाही का?
पूर्वसूचना देऊनही समस्या कायम राहत असेल आणि त्यानंतर भाविकाला कुत्रा चावत असेल, तर संस्थान आणि नगरपरिषद नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत?
साईभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न राजकारणाचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा विषय न बनवता तातडीने ठोस उपाययोजना करावी आणि मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा मानवीय व कायदेशीर पद्धतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी साईभक्तांकडून होत आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार कोण? प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप!
पाठपुरावा करूनही कारवाई शून्य!
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात असतानाही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळ किती दिवस?
शिर्डी ही देश-विदेशातील भाविकांची नगरी आहे. अशा शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा केवळ स्वच्छतेचा नव्हे, तर नागरिकांच्या आणि भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
‘स्वच्छ शिर्डी, सुंदर शिर्डी’च्या घोषणा पुरे झाल्या; आता ‘भयमुक्त शिर्डी’ प्रत्यक्षात आणा! प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल.