
शिर्डी :
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्ती, श्रद्धा आणि साईनामाचा अखंड जयघोष अनुभवायला मिळाला. राज्यासह देशभरातून आलेल्या लाखो साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा उत्साहात साजरा केला. विविध भागांतून आलेल्या पालख्यांमुळे संपूर्ण शिर्डी साईनामाच्या गजराने दुमदुमून गेली.
मुख्य दिवशी सकाळी ६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाल्यानंतर सकाळी ७ वाजता संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे व त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मिनी कचरे यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांच्यासह संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.

श्री साईसच्चरित अखंड पारायणाची सांगता मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत शिवाजी कचरे यांनी विणा, गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, तर भिमराज दराडे व खरेदी व्यवस्थापक कुणाल आभाळे यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग नोंदविला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, ग्रामस्थ आणि हजारो साईभक्त उपस्थित होते.
दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढविली. डॉ. मोनिका साई यांच्या साईभजनांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले, तर ह.भ.प. वेदश्री वैभव ओक यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. रात्री प्रसिद्ध गायक शैलेंद्र भारती यांच्या साईभजन संध्येनंतर श्रींच्या रथाची पारंपरिक मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असून शेजारती आणि दुसऱ्या दिवशीची काकड आरती होणार नाही.
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी भक्तांनी श्रींच्या चरणी उदंड दान अर्पण केले. आंध्र प्रदेशातील एलुरू येथील साईभक्त एम. श्रीनिवास राव यांनी ६२९ ग्रॅम वजनाचा नवग्रह नक्षीकाम असलेला सुमारे ₹८२.३९ लाख किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण केला. तसेच मुंबईतील एका साईभक्ताने ३०० ग्रॅम वजनाचा सुमारे ₹४७ लाख किमतीचा सुवर्णहार श्रींच्या चरणी अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
उत्सवाची सांगता गुरुवार, ३० जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रम, रुद्राभिषेक, काल्याचे कीर्तन, दहीहंडी, साईभजन, साईस्वर नृत्योत्सव तसेच गुरुवारच्या पारंपरिक पालखी सोहळ्याने होणार असल्याची माहिती संस्थान प्रशासनाने दिली.


