
शिर्डी, दि. २० : योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून नियमित योगाभ्यासासह मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, अहिल्यानगर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमैया विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी येथे योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी सैनिक कै. आर. बी. तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत आणि सूर्यतेज संस्था, कोपरगाव यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, सूर्यतेज संस्थेचे संस्थापक तथा स्वच्छतादूत सुशांत घोडके, केंद्रीय संचार ब्यूरोचे बबलूकुमार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास पाचपाटील, मुख्याध्यापक संजय राऊत, योगतज्ज्ञ संतोष नलगे, महेश थोरात, रोहित काळे, पर्यवेक्षक बाबासाहेब खळदकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व पटवून देत ओंकार उच्चारण, सूर्यनमस्कार, पद्मासन, उत्कटासन, पश्चिमोत्तानासन, ताडासन, वृक्षासन, बकासन, उत्तानपादासन, सर्वांगासन, हलासन आदी विविध योगासनांची शास्त्रोक्त माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांकडून या योगासनांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. ध्यान आणि प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धा आणि योग प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे आणि शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक संजय राऊत यांनी केले, तर प्रास्ताविक सुशांत घोडके यांनी केले. सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले.
ओंकार उच्चारण आणि गुरुमंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक संजय अमोलिक, राम ढोकचौळे, रुपाली टेके, माधुरी गायकवाड, योगेश चव्हाण, बाळासाहेब जोरी तसेच सोमैया विद्या मंदिरातील शिक्षक-शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.
लक्ष्मीवाडीसारख्या ग्रामीण भागात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या योग प्रशिक्षण कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व जाणून घेत नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला.

