
शिर्डी (प्रतिनिधी) नगर मनमाड तसेच निमगाव बायपास त्याचप्रमाणे इतर रस्त्यांवर उभ्या ट्रक मधून डिझेलची चोरी करणारी टोळी परत सक्रिय झाली होती. नुकतीच निमगाव कोऱ्हाळे येथील बायपास रस्त्यावर गाडेकर पेट्रोल पंपावर रात्री दोन कंटेनर ट्रक उभे असताना त्यातील डिझेल ची चोरी झाल्याचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.

त्यामुळे ट्रक चालकांमधून मोठी चिंता व्यक्त होत आहे. या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी ट्रक चालकांकडून व मालकांकडून होत होती. गाडेकर पेट्रोल पंप जवळ दोन ट्रक मधून सुमारे 300 लिटर डिझेल चोरी करणाऱ्यांचा तपास शिर्डी पोलिसांपुढे एक आवाहन होते.
शिर्डी पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून गुप्त माहितीच्या आधारे या डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा शोध सुरू केला असता बायपास मार्गावर एक स्विफ्ट डिझायर कार मध्ये डिझेलचा वास आल्याने या कारची तपासणी केली असता या कारमध्ये चोरीचे डिझेल सह चार लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना शिर्डी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
त्यामुळे ट्रक चालक मालकांकडून समाधान व्यक्त होत असून शिर्डी पोलिसांचे कौतुक होत आहे. या तीन आरोपींमध्ये समीर वजीर शेख, व आकाश रवींद्र मोकळ हे दोन सावळीविहीरचे असून करण राजू साळुंखे हा शिर्डीचा कोरडोबा नगरचा आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी की शहादेव मथरदेव ढाकणे या ट्रक चालकांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की,आपण ड्रायव्हिंग चे काम करतो.
मी व मित्र अनंत बालाजी ठेंगडे रा. रांजणगाव, ता. शिरुर, जिल्हा पुणे हा पण चालक आहे. आम्ही दोघेजण भकंज पोटावळे रा. वाघोली ता. शिरुर जिल्हा यांचे मालकीचे दोन कंटेनर नं.एम.एच-12, पी.क्यु-7501, व एम एच बारा पी क्यू 76 98 हा दोघे चालवत घेवुन दि. 29/05/2025 रोजी दुपारी 03/00 वाजणेचे सुमारास निघालो .
आम्ही रांजणगाव ता. शिरुर जिल्हा पुणे येथुन कंटेनर मध्ये फ्रिजचा माल भरुन मी व माझा मित्र अनंत असे आम्ही दोघांनी आपल्या दोन्ही कंटेनरमध्ये डिझेल भरुन भोपाळ येथे फ्रिजचा माल खाली करण्यासाठी रांजणगाव ता. शिरून जिल्हा पुणे येथुन अहिल्यानगर ते मनमाड मार्गे घेवुन जात होतो. त्यानंतर दि.30/05/2025 रोजी रात्री 01/30 वाजणेचे सुमारास निमगाव को-हाळे शिवार ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर येथुन जात असतांना आम्हाला झोप येत असल्यामुळे आम्ही येथील बायपास रस्त्यावर असणाऱ्या गाडेकर यांचे मालकीचे भारत पेट्रोल पंप येथे आतमध्ये दोन्ही कंटेनर लावून आम्ही थांबलो.
त्यानंतर मी झोपून गेलो व माझा मित्र अनंत याने मोबाईल चार्जिंग ला लावल्याने पहाटे 03/00 वाजेपर्यंत जागुन मोबाईल चार्जिंग करुन तो पण झोपला. त्यानंतर दि. 30/05/2025 रोजी सकाळी 06/00 वाजणेचे सुमारास आम्ही दोघे झोपेतुन उठुन फ्रेश होवुन आम्ही तेथुन जाण्यासाठी कंटेनर चालु केले असता दोन्हीही कंटेनरचे डिझेलचा काटा झिरो झालेला होता. त्यावेळी आम्ही डिझेल टाकी चेक केली असता टाकीमध्ये काहीही डिझेल शिल्लक राहीलेले नव्हते.
कंटेनर नं. एम. एच-12, पी.क्यु-7501, आणि कंटेनर नं.एम.एच-12, पी.क्यु-7698 यांचे डिझेलचे टाकीतील डिझेल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. त्यामुळे त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात यासंदर्भात अज्ञात भामट्यांविरोधात फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 593/ 2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303( दोन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत होते.हा तपास करत असताना त्यांना निमगाव बायपास रस्त्यावर एका स्विफ्ट डिझायर कार मध्ये डिझेलचा वास आल्याने तिची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीचे डिझेल मिळून आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे डिझेल व कार सह चार लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या डिझेल चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी समीर वजीर शेख, सावळीविहीर तसेच आकाश रवींद्र मोकळ ,सावळीविहीर व करण राजू साळुंखे कोरडोबा नगर शिर्डी या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.