शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर थेट आणि जहाल शब्दांत हल्लाबोल केला आहे. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याच्या राजकारणावरून पिपाडा यांनी विखेंना लक्ष्य करत, “शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याचे श्रेय तुम्हाला कधीच मिळू शकत नाही. श्रेय घ्यायचे असेल तर हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या,” असे सुनावले.
या रस्त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, कार्यकर्ते आणि विविध राजकीय नेते संघर्ष करत असल्याचे पिपाडा यांनी सांगितले. “कोणी रस्त्यावर उतरते, कोणी अधिकाऱ्यांच्या बैठका घेते, कोणी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन चर्चा करते, तर कोणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रश्न मांडते,” असे ते म्हणाले.
“विरोधी पक्षाच्या खासदारानेही पाठपुरावा केला!”
खासदार नीलेश लंके यांच्या भूमिकेचाही पिपाडा यांनी उल्लेख केला. “नीलेशजी लंके विरोधी पक्षाचे खासदार असूनही त्यांनी या रस्त्यासाठी आंदोलन केले आणि गडकरी यांच्या अनेकदा भेटी घेतल्या. विरोधी पक्षात असले तरी चांगल्याला चांगले म्हणण्याची आमची ताकद आहे,” असे पिपाडा यांनी स्पष्ट केले.
“संधी मिळाली, मग काम कुठे?”
सुजय विखे यांच्यावर निशाणा साधताना पिपाडा यांनी पुढे गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “तुम्हाला संधी मिळाल्यानंतरही या रस्त्याचे काहीच काम करता आले नाही. उलट या प्रश्नासाठी जे लोक संघर्ष करतात, त्यांना अडवणे, त्यांच्या विरोधात बोलणे, ठेकेदाराची उघडपणे बाजू घेणे आणि ठेकेदाराविरोधात तक्रारी करणाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणे एवढेच काम केले जात आहे.”
पिपाडा यांच्या या वक्तव्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न आता थेट राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे. रस्त्याच्या कामाचे श्रेय नेमके कोणाला, यापेक्षा प्रत्यक्षात रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि नागरिकांना मिळणारी सुविधा यावर सार्वजनिक चर्चा होणे गरजेचे असल्याचे या वादातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
“मंत्र्यांच्या मुलाला सांगतो—आता शांत बसा!”
आपल्या आक्रमक भूमिकेचा कळस करत पिपाडा यांनी सुजय विखेंना थेट उद्देशून म्हटले, “या निमित्ताने मी या मंत्र्याच्या मुलाला सांगतो, आता शांत बसा. शिर्डी–अहिल्यानगर रस्त्यावर पुन्हा बोलू नका.”
पिपाडा यांच्या या थेट इशाऱ्यामुळे शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याचा मुद्दा पुन्हा एकदा विखे विरुद्ध स्थानिक कार्यकर्ते असा राजकीय संघर्षाचा विषय बनण्याची चिन्हे आहेत. आता या आरोपांना सुजय विखे पाटील यांच्याकडून काय प्रत्युत्तर मिळते, याकडे शिर्डी–राहाता परिसराचे लक्ष लागले आहे.