
शिर्डी | प्रतिनिधी
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील पवित्र साईनगरी शिर्डीत आज पुन्हा एकदा साईभक्तांची दर्शनाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, “शिर्डीत साईभक्तांची लूट होणार नाही” असे नामदार विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी अनेकदा भाषणांत व प्रशासकीय बैठकींत स्पष्ट सांगितले असतानाही हा प्रकार घडल्याने विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना कुणीच किंमत देत नाही का? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
शिर्डी गाव साईभक्तांच्या श्रद्धेवर आणि त्यांच्या ये-जा वर अवलंबून असताना, त्याच साईभक्तांना एजंटमार्फत लुटले जात असेल तर ही गंभीर बाब नाही का? असा संताप सध्या भाविकांमध्ये व्यक्त होत आहे.
नेमकं घडलं काय? (फिर्यादीचा जबाब)
दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथील मानखुर्द–गोवंडी परिसरातील रहिवासी,
कोंडीबा मरीबा मुजमुले (वय 65, सेवानिवृत्त) हे इतर भाविकांसोबत शिर्डीत दर्शनासाठी आले होते.
सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास, श्री साईबाबा मंदिर गेट क्रमांक 3 समोर “साईपुष्प भंडार” या दुकानाजवळ
किरण भिमराव वाघ या इसमाने
“मी तुम्हाला थेट दर्शन करून देतो” असे सांगून 700 रुपये घेतले आणि पसार झाला.
भानावर येताच संबंधित साईभक्तांनी तात्काळ जवळील पोलीस चौकी गाठली. पोलिसांच्या मदतीने संबंधित इसमाला शोधून मोबाईल व पैसे परत मिळवण्यात आले, त्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रशासनाचा धाक संपलाय का? पोलिसांनी ‘खाकी’ दाखवायची वेळ
या घटनेनंतर साईभक्तांमध्ये तीव्र संताप आहे.
जर मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही धाक एजंटांना उरलेला नसेल, तर आता पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करत ‘खाकी’ दाखवण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा साईनगरीत रंगली आहे.
थेट सवाल – सुजय विखे लक्ष देतील का?
ज्या साईभक्ताची फसवणूक झाली, त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मात्र, माजी खासदार सुजय विखे पाटील या प्रकरणात लक्ष घालणार का?
की ‘दर्शन एजंट’ मोकाटच राहणार?
असा थेट सवाल आता साईभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.
शिर्डी पवित्र आहे, पण जर साईभक्तच सुरक्षित नसतील तर जबाबदारी कुणाची?
हा प्रश्न आज पुन्हा एकदा विखे मतदारसंघात ऐरणीवर आला आहे.

