शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेला शिपाई बाळासाहेब गोंदकर यांनी दक्षिणा पेटीतील रोकड चोरल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाला होता, या प्रकरणात गोंदकर यांना काल अटक करण्यात आली आहे.
गुन्हा उघडकीस आल्यानंतर संस्थान प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करत त्वरित बडतर्फ केले होते. आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयाने त्यास नकार दिल्याने ते स्वतःहून ६ जून रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाले. राहाता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीवेळी बाळासाहेब गोंदकर यांनी ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि त्यानंतर त्यांची चोरी केली.
या संदर्भात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर ४, ८ व १२ एप्रिल रोजीच्या मोजणी दरम्यान गोंदकरने बंडल मांडीखाली, पॅन्टमध्ये व मशीनच्या मागे लपवून नेल्याचे स्पष्टपणे दिसून आले.या चोरीची अंदाजित रक्कम सुमारे दीड लाख रुपये असल्याची प्राथमिक चर्चा आहे.
कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार
लेखा शाखेचे अधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी शिर्डी पोलिसात गोंदकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गोंदकर फरार होते. शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी याच्या शोधासाठी पथके तयार करून हालचाली सुरू ठेवल्या होत्या.
दरम्यान, गोंदकर यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने त्यास नकार दिल्याने, अखेर ६ जून रोजी तो स्वतःहून शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाले.
त्यानंतर त्यांना राहाता न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती शिर्डी पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहे.