शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धा, निस्सीम भक्तिभाव आणि समर्पणाची अनोखी प्रचिती पुन्हा एकदा शिर्डीत पाहायला मिळाली आहे. मुंबई येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी तब्बल ९४ लाख ८६ हजार ७७० रुपये बिलमूल्य असलेले अत्यंत आकर्षक व कलात्मक सुवर्ण-रजत घड्याळ अर्पण केले आहे. या अनमोल देणगीमुळे साईभक्तांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
या घड्याळाच्या निर्मितीसाठी १८ कॅरेट सोन्याचे ६६९.२२० ग्रॅम, ९२५ शुद्धतेच्या चांदीचे ३१९.७२० ग्रॅम तसेच ०.३०० कॅरेट रंगीत खड्यांचा वापर करण्यात आला आहे. सोने, चांदी आणि रंगीत खड्यांच्या सुरेख संगमातून साकारलेले हे घड्याळ आपल्या आकर्षक रचना आणि कलात्मकतेमुळे विशेष उठून दिसत आहे.

देश-विदेशातील लाखो साईभक्त आपल्या श्रद्धेनुसार श्री साईबाबांच्या चरणी विविध मौल्यवान वस्तू, सोने, चांदी आणि इतर देणग्या अर्पण करीत असतात. त्याच भक्तिपरंपरेतील ही आणखी एक अनमोल भेट ठरली आहे.
दरम्यान, या देणगीदार साईभक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केल्याने त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. याबाबत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर यांनी माहिती दिली.
साईभक्तांची श्रद्धा अनमोल, साईचरणी अर्पण प्रत्येक भेट मौल्यवान!