शिर्डी-कोपरगाव मतदारसंघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याची लगबग सुरू होती. सर्वत्र स्वागताचे बॅनर, फुलांचे तोरण, राजकीय नेते व कार्यकर्त्यांची धावपळ — संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला होता.
पण या चमकदार वातावरणाच्या मागे एक वेगळीच चर्चा नागरिकांमध्ये रंगली —
“मंत्रिजी, तुम्ही रोज या…!”
कारण काय माहित आहे का?
ज्या नगर–मनमाड रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात, ज्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होतात, त्याच रस्त्याची एका रात्रीत डागडुजी झाली!
अनधिकृत गतिरोधक गायब झाले, खड्डे बुजले, आणि नव्या डांबराचा सुगंध हवेत दरवळू लागला.
लोकांचे आश्चर्य दाटून आले —
“आपल्याला सुरक्षित प्रवासासाठी मंत्री लागतात का?”
दररोज लोक मरतात, जखमी होतात, पण तेव्हा प्रशासन झोपेत असतं.
आणि आज?
मंत्री येणार म्हटल्यावर सगळ्या यंत्रणा जणू जिवंत झाल्या!
लोकांनी कटाक्ष टाकत उपरोधाने म्हटलं —
“मंत्रिजी, तुम्ही रोज या… म्हणजे आमचे रस्ते तरी रोज दुरुस्त होतील!”
अमित शाह हे शिर्डीहून प्रवरानगरमार्गे लोणीकडे जाणार असल्याने, तो संपूर्ण मार्ग एकदम गुळगुळीत करण्यात आला.
परिसर झळाळून गेला, पण सामान्य नागरिकांच्या मनात जळत राहिला तो एकच प्रश्न —
“आपल्या जीवाचं मोल फक्त मंत्र्यांच्या दौऱ्यापुरतंच का?”
आज शिर्डी-कोपरगाव परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या अंतःकरणातून एकच भावना उमटली —
“मंत्रिजी, तुम्ही रोज या,
म्हणजे आमचे रस्ते रोज डांबरीत होतील,
आमचे जीव रोज सुरक्षित राहतील,
आणि आम्हालाही एक दिवस नागरिक म्हणून किंमत मिळेल.

