
शिर्डी, दि. २५ : श्री साईबाबा संस्थानच्या सशुल्क प्रसादालयात कर्मचाऱ्यांशी अरेरावी, शिवीगाळ, कामकाजात अडथळा निर्माण करणे, साईभक्तांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे तसेच सोशल मीडियावर संस्थानची बदनामी केल्याच्या आरोपावरून कोपरगाव येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख भरत मोरे यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली असून संस्थान परिसरातील शिस्त व सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालय विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले जगन्नाथ सिताराम मुंढे (वय ५५) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. मुंढे हे संस्थानच्या सशुल्क भोजन हॉल क्रमांक १ येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असून साईभक्तांना भोजन वाढणे, भोजन व्यवस्थेवर देखरेख ठेवणे, मान्यवरांची भोजन व्यवस्था सांभाळणे तसेच कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे ही त्यांची जबाबदारी आहे.
चपाती उशिरा मिळाल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी
फिर्यादीनुसार, दि. २३ जून रोजी दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास सशुल्क भोजन हॉलमध्ये नेहमीप्रमाणे साईभक्तांना भोजन देण्याचे काम सुरू होते. यावेळी प्रसादालयातील अनेक कर्मचारी ड्युटीवर कार्यरत होते. त्याचवेळी भोजनासाठी आलेले भरत मोरे यांनी अचानक मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
त्यांना चपाती उशिरा मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी आक्षेप घेत कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीस मोबाईलवर संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यास सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, भरत मोरे यांनी प्रसादालयातील कर्मचाऱ्यांविषयी अपमानास्पद व आक्षेपार्ह भाषा वापरत शिवीगाळ केली. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांचे ओळखपत्र हाताने ओढून तपासल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी एका कर्मचाऱ्याला त्याच्या भाषिक ओळखीवरूनही लक्ष्य करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रसादालयातील कर्मचाऱ्यांच्या नियमित कामकाजात अडथळा निर्माण झाला. तसेच भोजनासाठी आलेल्या साईभक्तांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, “मी तुम्हाला येथे कोणालाही काम करू देणार नाही,” अशा स्वरूपाच्या धमक्या देत संबंधितांनी प्रसाद वाटपाचे काम थांबविण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे प्रकरण अधिक चिघळले
घटनेनंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम व फेसबुक खात्यांवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप संस्थान प्रशासनाने केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रसादालयातील भोजनाच्या दर्जाबाबत चुकीची माहिती देण्यात आली असून, “प्रसादालयातील चपाती आणि पापड खाण्यास अयोग्य आहेत,” असे सांगून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
विशेष म्हणजे, शिर्डीत दररोज हजारो साईभक्त प्रसादालयात भोजन घेत असतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विविध कलमांखाली गुन्हा दाखल
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०५५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२, २२१, ३५१(२), ३५२, ३५६(२), २९२, २९६ व २२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

