

शिर्डी : महार. राधाकृष्ण विखे प यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ समाजसेवक सुरेश आरणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईनाथ रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. साईनगरीतील युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश दिला.
वाढदिवस म्हटला की केवळ केक कापणे, फटाके फोडणे किंवा जाहिरातबाजी करणे अशी परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र समाजहिताला प्राधान्य देत रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. श्री साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही फळे देऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले.
या प्रसंगी सुरेश आरणे यांनी रुग्णांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत माणुसकीचा हात पोहोचला पाहिजे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. साईबाबांच्या कर्मभूमीत सेवा हाच खरा धर्म असून, गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना सुरेश आरणे म्हणाले, राधाकृष्ण विखे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. आज आपण त्यांचा वाढदिवस मंत्री म्हणून साजरा करत आहोत. भविष्यात मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा विश्वास आहे. मतदारसंघात झालेली विकासकामे ही राज्यासाठी आदर्शवत आहेत. तसेच. सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीने मी प्रेरित असून त्यांना गुरुस्थानी मानतो.”
या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या युवकांनी देखील रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याची भावना व्यक्त केली. राजकीय कार्यक्रमांपेक्षा सामाजिक जाणीव जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे रुग्ण, नातेवाईक तसेच उपस्थित नागरिकांनी स्वागत केले.
सुरेश आरणे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेला हा फळवाटपाचा उपक्रम साईनगरीत चर्चेचा विषय ठरला असून, वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.
या प्रसंगी कार्यकर्ते, युवक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


