
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 अंतर्गत दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरभेटींद्वारे मतदार पडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांनी शहरातील सर्व नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
नगराध्यक्षा थोरात यांनी सांगितले की, शिर्डी शहरातील सर्व मतदारांनी आपला पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. मतदान अधिकारी (BLO) घरभेटीदरम्यान देणारा गणना अर्ज स्वतः भरून स्वाक्षरीसह जमा करावा. अर्जाची एक प्रत स्वतःकडे ठेवावी तसेच फॉर्म व्यवस्थित भरला गेला असून त्यावर स्वतःची सही झाल्याची खात्री करावी.

या विशेष पुनरीक्षणासाठी जन्म दाखला, दहावीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक, टपाल किंवा विमा संस्थेचे जुने ओळखपत्र आदी कागदपत्रांचा उपयोग होऊ शकतो. आधार कार्ड हे ओळख पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
नागरिकांनी घरभेटीपूर्वी ECINet App किंवा voters.eci.gov.in वर स्वतःची माहिती तपासून नाव, आई-वडिलांचे नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक पडताळून घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही,” या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून, प्रत्येक नागरिकाने वेळेत प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांनी केले आहे. तसेच ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचेही त्यांनी आवाहन केले.

