
शिर्डी | प्रतिनिधी
जगभरातील साईभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीत चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी कारनामा करत पोलीस यंत्रणेलाच खुले आव्हान दिले आहे. चक्क श्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोर भरदिवसा एका महिला साईभक्तेच्या गळ्यातील ५३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याने साईनगरीतील सुरक्षा व्यवस्थेचा बुरखा फाटला आहे.
कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातून साईदर्शनासाठी आलेल्या सरोजम्मा संज्जुडा दौडा (वय ५८) या महिला आपल्या नातेवाईकांसह हॉटेलकडे जात असताना दोन अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. या मंगळसूत्राचे वजन तब्बल ५३ ग्रॅम असल्याची माहिती समोर आली आहे.
भाविकांचे संरक्षण कोण करणार?
दररोज हजारो भाविक मंदिर परिसरात वावरत असताना मंदिराच्या मुख्य परिसरालगतच अशा प्रकारची घटना घडते, याचा अर्थ चोरट्यांच्या मनात पोलिसांचा धाक उरलेला नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. श्रद्धेने शिर्डीत येणाऱ्या भाविकांना जर मंदिर परिसरातही सुरक्षित वाटत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
सीसीटीव्ही, गस्त आणि सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे?
मंदिर परिसर, गेट परिसर आणि मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस गस्त आणि सुरक्षा कर्मचारी तैनात असतानाही चोरटे सहजपणे गुन्हा करून पसार होतात, हे चिंताजनक आहे. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत.
पोलीसांसमोर मोठे आव्हान
घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मात्र भाविकांचे लुटलेले दागिने परत मिळवणे आणि आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करणे हे आता पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
साईभक्तांमध्ये संताप
“साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आणि भरदिवसा लुटलो गेलो,” अशी भावना अनेक भाविक व्यक्त करत आहेत. श्रद्धेच्या नगरीत वाढत्या चोऱ्या, पाकीटमारी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे साईभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
साईनगरीची प्रतिमा जपायची असेल तर चोरट्यांच्या मुसक्या आवळून भाविकांना सुरक्षित वातावरण देणे ही काळाची गरज बनली आहे.
नूतन पोलीस अधीक्षकांनी शिर्डीकडे विशेष लक्ष द्यावे!
शिर्डी ही केवळ महाराष्ट्राची नव्हे तर जगभरातील साईभक्तांची श्रद्धास्थान नगरी आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र अलीकडच्या काळात चेन स्नॅचिंग, पाकीटमारी, फसवणूक आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोर भरदिवसा साईभक्त महिलेचे ५३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेण्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. अशा घटना शिर्डीच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या आहेत.
नूतन पोलीस अधीक्षकांनी शिर्डी शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मंदिर परिसर, प्रमुख रस्ते, हॉटेल परिसर आणि भाविकांच्या वर्दळीच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त, गुप्त पथके आणि प्रभावी गस्त वाढविण्याची गरज आहे.
“साईभक्तांची सुरक्षा हीच शिर्डीची प्रतिष्ठा” हे लक्षात घेऊन चोरट्यांवर कठोर कारवाई करावी आणि भाविकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी अपेक्षा नागरिक आणि साईभक्त व्यक्त करीत आहेत.

