
शिर्डी : श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत हजारो आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ सोनवणे यांनी जोरदार आवाज उठवला आहे. इनसोर्स आणि आऊटसोर्स कर्मचाऱ्यांमधील वेतन व सुविधांतील मोठी तफावत तात्काळ दूर करून आऊटसोर्स कर्मचाऱ्यांनाही समान वेतन, वैद्यकीय सुविधा आणि इतर सवलती देण्यात याव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
साई संस्थानमध्ये सध्या सुमारे तीन ते साडेतीन हजार आऊटसोर्स कर्मचारी विविध विभागांत सेवा बजावत आहेत. मंदिर व्यवस्था, प्रसादालय, सुरक्षा, स्वच्छता आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या विभागांचा कारभार हे कर्मचारी रात्रंदिवस सांभाळत असतानाही त्यांना अत्यंत तुटपुंजे मानधन मिळत असल्याची खंत सोनवणे यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, एखाद्या आऊटसोर्स कर्मचाऱ्याने काही अपरिहार्य कारणामुळे सुट्टी घेतल्यास त्याच्या पगारातून थेट ९०० रुपयांची कपात केली जाते. मात्र, याच संस्थानमधील इनसोर्स कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई होत नसल्याने हा उघड भेदभाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन वेगवेगळे न्याय का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक आऊटसोर्स कर्मचारी सेवा देत आहेत. विडंबना अशी की, ज्या हॉस्पिटलसाठी हे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेतात, त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना मोफत उपचाराची सुविधा मिळत नाही. त्यामुळे सर्व आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सुविधा तातडीने लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रश्नांकडे राज्य सरकार आणि संस्थान प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. हजारो कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सुरू झालेली ही लढाई आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, संस्थान प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

