
अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड; सोने, चांदी, डॉलर जप्त… ED च्या तपासाने उडाली खळबळ 💥
अहिल्यानगर/नाशिक : समता पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्था प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) करत असलेल्या तपासातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून आर्थिक व्यवहार, संशयित बँक खाती आणि बेनामी मालमत्तांचा तपास करणाऱ्या ED च्या हाती अखेर कोट्यवधींचं घबाड लागलं असून, मुख्य आरोपी अशोक खरात यांच्या बँक लॉकरमधून सोने, चांदी, अमेरिकन डॉलर आणि मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, समता पतसंस्था आणि सिन्नर येथील जगदंबा पतसंस्था या दोन संस्थांशी संबंधित तब्बल 132 बँक खात्यांचा तपास सुरू होता. यामध्ये 100 खाती समता पतसंस्थेशी तर 32 खाती जगदंबा पतसंस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहारांमधील संशयास्पद हालचालींचा मागोवा घेत असताना ED ला नाशिकमधील एका को-ऑपरेटिव्ह बँकेतील लॉकरची माहिती मिळाली होती.
यानंतर ED ने संबंधित लॉकर सीज करत पुढील प्रक्रिया सुरू केली. अखेर कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लॉकर उघडण्यात आले आणि त्यामधून अक्षरशः कोट्यवधी रुपयांची संपत्ती समोर आली. नाशिक येथील विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबई नाका शाखेतील 555 क्रमांकाच्या लॉकरमधून तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 1 कोटी 89 लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू आणि सुमारे 5500 अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे लॉकर अशोक खरात आणि त्यांची पत्नी कल्पना खरात यांच्या संयुक्त मालकीचे असल्याचे समोर आले असून, मुलगी सृष्टी खरात हिच्या उपस्थितीत ED ने लॉकर उघडले. तपासादरम्यान लॉकरमधून केवळ सोने-चांदीच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर बेनामी मालमत्तांशी संबंधित कागदपत्रेही सापडली आहेत.
पुणे, नाशिक आणि सोलापूर परिसरातील अनेक जमिनी, मालमत्ता विक्री करार आणि 70 ते 80 भूखंडांशी संबंधित दस्तऐवज ED च्या हाती लागल्याची माहिती आहे. या कागदपत्रांमुळे आणखी मोठ्या आर्थिक जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक बेनामी व्यवहार, इतर संशयित नावे आणि आर्थिक व्यवहारांचा तपास आता अधिक तीव्र होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ED च्या या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता असून, अनेक धनदांडग्यांची चौकशी ED च्या रडारवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे समता आणि जगदंबा पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, ठेवीदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
