
ग्रोमोर गुंतवणूक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला जेलची हवा लागताच आता त्याचा सूरच बदलल्याचे दिसत आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून सध्या नंदुरबार कारागृहात असलेला सावळे आता ठेवीदारांकडेच गयावया करत “मला बाहेर काढा, मी सर्वांचे पैसे परत करतो,” अशी विनंती करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रोमोर कंपनीच्या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला भूपेंद्र सावळे सध्या नंदुरबार जेलमध्ये आहे. या प्रकरणामुळे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले असून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान सावळेचा वकील अॅड. बी. ए. भुसळे हे त्याच्या संपर्कात असून व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच प्रत्यक्ष भेटींद्वारे त्याची बाजू मांडण्याचे काम सुरू आहे. नुकतीच त्यांनी नंदुरबार कारागृहात जाऊन भूपेंद्रशी चर्चा केली. त्या वेळी सावळे visibly अस्वस्थ आणि नाराज असल्याचे दिसून आले.
वकिलांशी संवाद साधताना सावळे म्हणाला की, “मी ठेवीदारांचे पैसे देण्यापासून पळ काढलेला नाही. सर्वांचे पैसे परत करण्याची माझी तयारी आहे. मात्र त्यासाठी मला जेलमधून बाहेर येणे आवश्यक आहे. मी बाहेर आलो तरच पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू होईल.”
यावेळी त्याने ठेवीदारांनी जामिनासाठी सहकार्य करावे, अशीही विनंती केल्याचे सांगितले जात आहे. मात्र फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांकडून अद्याप कोणतीही सकारात्मक भूमिका दिसून येत नसल्याने सावळेच्या सुटकेचे मार्ग बंदच असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान अॅड. भुसळे यांनी सांगितले की, नुकतीच त्यांची भूपेंद्र सावळेसोबत ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी सावळेने बाहेर आल्यानंतर महिना ते दीड महिन्याच्या आत सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी आवश्यक सिव्हिल प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भुसळे यांनी पुढे सांगितले की, “तो जेलमध्ये राहिला तर पैसे परत मिळणार नाहीत. मात्र तो बाहेर आला तर सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे ठेवीदारांनी जामिनासाठी सहकार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच पुढील दोन ते तीन महिन्यांत सावळेला जामिनावर बाहेर काढण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कोट्यवधींच्या या घोटाळ्यात फसवले गेलेल्या ठेवीदारांचा संताप आणि तपास यंत्रणांची भूमिका यावरच आता या प्रकरणाचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.

