
अहिल्यानगर :
केडगाव बायपास रोडलगत असलेल्या अनुराज टॉवर/गोडाऊनमध्ये अवैधरित्या टँकरमधून व्यवसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत गॅस काळाबाजाराचा मोठा रॅकेट उध्वस्त केले. या कारवाईत ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गोडाऊन मालक फरार झाला आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई
दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी प.नि. श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.
पथकामध्ये पोलीस अधिकारी हरिष भोये, अनंत सालुगडे तसेच पोलीस अंमलदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकाले, दीपक घाटकर, बिरया करमल, राहुल द्वारके, शामसुंदर जाधव, भिमराज खसे, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सतीश भवर, योगेश कर्डिले, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे व अरुण मोरे यांचा समावेश होता.
छापा टाकताच उघड झाला काळाबाजार
पथकाने केडगाव बायपास रोडलगत पाल्याचे गोडाऊन तपासले असता गॅस रिफिलिंग सुरू असल्याची खात्री झाली. थेट कारवाई करत गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांची नावे पुढीलप्रमाणे समोर आली :
- कृष्णा मधुकर दहिफळे (वय 30), रा. कोळवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर
- अदित्य सुनिल पवार (वय 21), रा. बुलढाणा, हल्ली रा. नील हॉटेल, केडगाव
- विश्वास प्रियकशिदेव (वय 51), रा. केडगाव, अहिल्यानगर
- जनातुल शेख (वय 19), मूळ रा. नदीया, वेस्ट बंगाल, हल्ली रा. केडगाव
चौकशीत त्यांनी कोणताही शासकीय परवाना नसल्याचे कबूल केले. HP गॅस टँकरमधून जुगाड करून भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक टाक्यांमध्ये गॅस भरणे हा धोकादायक आणि बेकायदेशीर व्यवसाय ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करत असल्याची माहितीही समोर आली.
गोडाऊन मालक फरार
तपासात गोडाऊनचा मालक राजू सावळे, रा. केडगाव असल्याचे निष्पन्न झाले असून तो फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
४९ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
पंचासमक्ष केलेल्या पंचनाम्यात खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :
१७ टन HP गॅस – अंदाजे किंमत : ₹18,36,339/-
HP गॅस टँकर – किंमत : ₹30,00,000/-
भारत गॅस कंपनीच्या २० रिकाम्या टाक्या – किंमत : ₹60,000/-
५ भरलेल्या टाक्या – किंमत : ₹22,500/-
एक छोटा HSC टेम्पो – ₹2,00,000/-
लोखंडी अॅडजेस्टेबल पाना – ₹500/-
इलेक्ट्रॉनिक वजनकाटा – ₹5,000/-
गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे पाच पाईप असलेले नोजल – ₹2,000/-
एकूण जप्त मुद्देमाल : ₹49,26,339/-
कायदेशीर कारवाई सुरू
शासकीय परवाना नसताना अवैधरीत्या ज्वलनशील गॅसचा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा असून संबंधित आरोपींवर आवश्यक गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोडाऊन मालकाच्या अटकेसाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

