Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
शिर्डी

पंचक्रोशीतील श्रद्धास्थान आणि गावचे ग्रामदैवत श्री परशुराम महाराज देवस्थान!

राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री परशुराम महाराज हे सावळीविहीर सह परिसरातील गावांचे मोठे श्रद्धास्थान असून श्री परशुराम महाराजांची यात्रा श्री दत्त जयंतीला 26 व 27 डिसेंबर 2023 रोजी भरत आहे. त्यानिमित्ताने श्री परशुराम महाराज देवस्थान भोजडे येथील भक्तांनी दिलेली आख्यायिका थोडक्यात माहितीसाठी देत आहे.
राहाता तालुक्यातील नगर मनमाड रोडवर वसलेले सावळीविहीर बुद्रुक हे एक मोठे गाव असून या गावातून रुई कडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत या गावाचे ग्रामदैवत असणारे श्री परशुराम महाराजांचे देवस्थान आहे. येथील श्री परशुराम महाराजांचे मंदिर सुंदर व आकर्षक असे रेखीव मंदिर आहे. पूर्वी येथे एक छोटेसे मंदिर होते. परंतु सुमारे 40-45 वर्षांपूर्वी कै.परशराम पाटील आगलावे यांच्या प्रेरणेने व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. उत्तरामुखी असणाऱ्या या मंदिरात एक छोटासा ओटा असून या ओट्यावर श्री परशुराम महाराजांची सुमारे दोन अडीच फुटाची मूर्ती आहे. मूर्तीला शेंदूर दिलेला असून समोरच दिवा आहे. ही आकर्षक श्रींची मूर्ती भक्तांना नेहमी समाधान दिल्याशिवाय राहत नाही .अशा या देवस्थान बद्दलची एक जुनी आख्यायिका सर्वश्रुत आहे. पूर्वी इंग्रज राजवट असताना कोपरगाव तालुक्यातील भोजडे या गावी पुरातन असे श्री.
वीरभद्राचे मंदिर होते. या मंदिरात धनगर समाजाचा एक भक्त राहत होता. तो येथेच फलाहार करून व देवाची पूजा अर्चा करून राहत असे, त्याला श्री वीरभद्र प्रसन्न असल्याने तो देवाच्या कृपेने भक्तांच्या अडचणी उदीने किंवा भंडाऱ्यांने सोडवीत असत तसेच या भक्ताने वर्तवलेले भाकीत, भविष्य सुद्धा खरे ठरत असे, त्यामुळे या भक्ताची पंचक्रोशीत सर्वत्र वाहवा ,प्रसिद्धी झाली होती. अनेक जण येथे दर्शनाला येऊन आपले या भक्तांकडून भविष्य जाणत असत, मात्र या गोष्टीवर त्यावेळी इंग्रजांचा विश्वास बसेना, मग त्यांनी या बाबांची परीक्षा पाहण्याचे ठरवून त्यांनी एका गाभण घोडीला मंदिरात आणून या घोडीच्या पोटातील गर्भ जन्माला आल्यानंतर शिंगरू (घोडा) आहे की घोडी होईल असे बाबाला सांगण्यास फर्मान सोडले. तेव्हा बाबा ने श्री वीरभद्र कृपेने या घोडीला शिंगरूच होईल व तेही पायी चारोला! मस्तकी चिरा व डोळी घारोळा !!असा तो घोडा शिंगरू राहील असे भाकीत वर्तविले व त्यांच्या भविष्यवाणी प्रमाणे काही दिवसातच घोडीला खरेच मस्तकी चिरा म्हणजे रेषा असणारा घाऱ्या डोळ्यांचा घोडा शिंगरू जन्माला आला. हे पाहून इंग्रज थक्क झाले .त्यांनी या भक्तांचा उपयोग आपल्याला पुढील राजनीती किंवा इतर गोष्टी समजून घेण्यासाठी भविष्य जाणण्यासाठी होईल. अशा कपटी हेतुने त्यांनी या बाबांना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र श्री वीरभद्र कृपेने बाबांना हे आगोदरच समजले व इंग्रजांनी त्यांना ताब्यात घेण्याच्या अगोदरच ते वीरभद्रच्या कृपेने भोजडे येथील मंदिरातच गुप्त झाले त्यानंतर ते काही दिवसांनी वारी कान्हेगाव येथे दिसले. मात्र ही खबर इंग्रजांना लागल्यानंतर इंग्रज त्यांना घेण्यासाठी तेथे गेले असता बाबा परत तेथेही गुप्त झाले व तिसऱ्यांदा बाबा सावळीविहीर बुद्रुक येथे रुई रोड लगत दिसले .येथेही इंग्रज पोहोचले .पण येथेही बाबा गुप्त झाले. ते इंग्रजांच्या हाती लागले नाही .

sai nirman
जाहिरात

त्यांना श्री वीरभद्र च्या कृपेने एक प्रकारे दैवी शक्ती प्राप्त झालेली होती आणि या दैवी शक्तीच्या माध्यमातून त्यांना भविष्य ज्ञान होते. ते सावळीविहीर येथे गुप्त झाल्यानंतर मात्र त्यानंतर ते परत कधी कुठे दिसले नाही. अशा ज्या ज्या ठिकाणी बाबा दिसले त्या त्या ठिकाणी त्यांची मंदिरे बांधण्यात आली. त्या श्री वीरभद्र महाराजांच्या भक्तांचे ,बाबांचे नाव श्री परशु बाबा असे होते. त्यांची भोजडे,वारी व सावळीविहीर येथे मंदिरे बांधण्यात आली. श्री परशुराम महाराज हे श्री वीरभद्र च्या कृपेने एक दैवी शक्ती प्राप्त झालेले दैवी पुरुष होते. त्यामुळे त्यांच्या येथील मंदिरात नेहमी भाविक दर्शनासाठी येत असतात. गावामध्ये पूर्वी गाभण गाय म्हैस असली तर ती वासराला ,पारडाला सुरक्षित, सुखरूप जन्माला घालण्यासाठी अशा गाभण गाई म्हैस येथे मंदिरात आणून मंदिराला प्रदक्षिणा घालून येथील उदी या गाई म्हशींना लावली जात असे. एवढेच नव्हे तर गावात विंचू साप कोणाला चावला तर त्या व्यक्तीला या मंदिरात आणून श्री परशुराम महाराजांची उदी लावली जात असे व त्यामुळे या संकटातून ती व्यक्ती देवी शक्ती ने मात करीत. अशी येथील भाविकांची श्रद्धा होती व आहे. येथे आपली मनोकामना पुरी व्हावी म्हणून अनेक जण श्री परशुराम महाराजांना नवस करतात .पेढे, गुळाची शरणी वाटून नवस फेडतात. पूर्वी येथे कोंबड्या बकरी बळी दिले जात असत .मात्र अनेक वर्षापासून ही प्रथा बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्री परशुराम महाराजांची श्री दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या दिवशी भोजडे येथील भक्तांनी तेथून आणलेल्या मानाच्या काठीला गावातून मिरवणूक काढून मोठा सन्मान दिला जातो. आजही श्री परशुराम महाराजांचे भक्त हे अंगामध्ये घोंगडी चा शर्ट किंवा कोट घालतात. यात्रेच्या दिवशी सायंकाळी भक्ताच्या दैवी शक्तीमुळे येथे लहान मुलांनी खचाखच भरलेल्या बारा गाड्या ओढल्या जातात. गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा यात्रेच्या दिवशी सुरू आहे. बारा गाड्या भक्तांकडून ओढल्यानंतर श्री मंदिरासमोर या भक्तांकडून भाकीत वर्तवले जाते. आगामी वर्षातील पाऊस पाणी, गावाचा आनंद यासंदर्भात ते आपले भाकीत वर्तवतात व ते बहुतांशी भाकीत खरे ठरत असते. असा येथील भाविकांचा विश्वास असून श्री परशुराम महाराजांच्या यात्रेनिमित्त येथे भोजडे इथून आलेल्या भक्तांनाही दोन दिवस मोठा मान सन्मान दिला जातो. यात्रेनिमित्त गावातील तरुण कोपरगावला जाऊन गोदावरी नदीतून गोदाजल आणून श्रींना जलाभिषेक घालतात. यात्रेनिमित्त मंदिरावर रंगरंगोटी,आकर्षक विद्युत रोषणाई, केली जाते .शोभेच्या दारूची तसेच विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल यात्रेनिमित्त गावात असते. गावातील लहान थोर वृद्ध महिला त्याचप्रमाणे बाहेरगावी दिलेल्या गावातील मुली ,नोकरी निमित्त बाहेर गेलेले गावातील नोकरदार हे यात्रेनिमित्त गावात येतात. दरवर्षी समस्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात श्री परशुराम महाराजांची यात्रा भरवली जाते. त्यानिमित्त श्रींचे अभिषेक पूजा धार्मिक कार्यक्रम पार पाडले जात असतात. यावर्षी 26 व 27 डिसेंबर 2023 रोजी श्री परशुराम महाराजांची यात्रा असून 26 डिसेंबर 2023 ला सकाळी गोदाजलाने श्रींना अभिषेक स्नान, भोजडे येथून आलेल्या मानाच्या काठीची गावातून मिरवणूक, त्यानंतर सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम व त्यानंतर शोभेच्या दारूची आतषबाजी होणार आहे. 27 डिसेंबरला सायंकाळी शिवानी चा नाद खुळा हा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे 26 व 27 या दोन्ही दिवशी आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा ,यात्रेचा दर्शनाचा ,भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा .असे आवाहन समस्त ग्रामस्थ, यात्रा कमिटी सा.वि.बु,यांनी केले आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button