राहाता | प्रतिनिधी
पुणतांबा परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गौण खनिजाची बेकायदा वाहतूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणतांबा-कोपरगाव मार्गावरील पिंपळवाडी फाट्याजवळ विना परवाना मातीची वाहतूक करणारा १२ टायरचा डंपर राहाता पोलिसांच्या कारवाईत सापडला. या कारवाईत तब्बल २ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१९ सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजता एमएच १४ एमएच ५६५३ क्रमांकाचा डंपर ६ ब्रास गौण खनिज माती घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. संबंधिताकडे माती वाहतुकीचा परवाना नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मातीची किंमत अवघी ३ हजार ६०० रुपये; मात्र बेकायदा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या डंपरची किंमत तब्बल २ लाख ५० हजार रुपये! त्यामुळे गौण खनिजाच्या चोरीच्या व्यवहारामागे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या यंत्रणेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी संग्राम बाळासाहेब देशमुख यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८६/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. चालकाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून त्याचा शोध सुरू आहे.
‘माती’च्या नावाखाली कोणाचा आर्थिक खेळ?
रात्रीच्या वेळी गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर, त्यांना मिळणारी परवानगी आणि प्रत्यक्ष वाहतूक यामध्ये तफावत आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. एका डंपरवर कारवाई झाली; मात्र अशाच प्रकारे आणखी किती वाहने रात्रीच्या अंधारात धावत आहेत? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस पुढील तपास करीत आहेत.
साईदर्शनचा सवाल : गौण खनिजाची चोरी थांबणार कधी?