
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरात चैन स्नॅचिंग, जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिर्डी पोलिसांनी अॅक्टिव्ह मोड स्वीकारला असून, रूट मार्चदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत शिर्डी शहर व परिसरातील पाच गुन्हे उघडकीस आले असून, तब्बल ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंग, जबरी चोरी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांना दिल्या होत्या. त्यानुसार शिर्डी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथक तयार केले होते.
रूट मार्चदरम्यान संशयितांवर नजर
दि. १९ सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात रूट मार्च सुरू असताना रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बन्सी हॉटेलजवळ दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या मोटारसायकलवर फिरताना तपास पथकाच्या निदर्शनास आले.
पोलीस अंमलदार सतपाल शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत संशयितांचा पाठलाग केला. यावेळी एकाला पकडण्यात आले, तर दुसरा पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याचाही शोध घेत काही वेळातच त्याला ताब्यात घेतले.
पकडलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रेम सुधाकर पवार (वय २७, रा. टाकळीगाव, ता. जि. नाशिक) असे सांगितले. पळून गेलेल्या साथीदाराचे नाव विनोद गंगाराम पवार (रा. राजीवनगर, नाशिक) असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
चौकशीत चैन स्नॅचिंगचे धक्कादायक खुलासे
दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी शिर्डी शहर व परिसरात चैन स्नॅचिंग तसेच मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दि. २ जुलै २०२६ रोजी रांजणगाव देशमुख, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी श्री साईबाबा मंदिरालगत नगर-मनमाड रोड तसेच दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळवाडी रोडवरील अल्ट्राटेक सिमेंट दुकानाजवळ महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चैन जबरीने ओढून चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
तसेच कालिकानगर, शिर्डी येथील दि. २५ एप्रिल २०२६ रोजीच्या साईबाबा हॉस्पिटल परिसरातील गुन्ह्यासह एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, सागर काळे, प्रदीप बोराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक आकांक्षा जाधव तसेच सचिन धनाड, रामेश्वर वेताळ, सतपाल शिंदे, नितीन शेलार, सुनील दिघे, अजय अंधारे, नामदेव नालेगावकर, राजेंद्र बिरदवडे, प्रमोद जाधव, राजपूत, विजय धनेधर आदी अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक आकांक्षा जाधव करीत आहेत.
शिर्डी पोलिसांचा ‘अॅक्टिव्ह मोड’ चर्चेत!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात रूट मार्च सुरू असतानाच संशयितांच्या हालचाली टिपून त्यांचा पाठलाग करणे, एकाला घटनास्थळी पकडणे आणि पळून गेलेल्या दुसऱ्यालाही तातडीने जेरबंद करणे, यामुळे शिर्डी पोलिसांच्या सतर्कतेचे दर्शन घडले. चैन स्नॅचिंगच्या पाच गुन्ह्यांचा छडा आणि ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने गुन्हेगारांवर पोलिसांची नजर किती बारकाईने आहे, हे या कारवाईतून स्पष्ट झाले.